टोळीतील अट्टल चोराला पोलिसांनी पाठलाग करुन पकडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

आश्वी (नगर) : संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील डोळासणे परिसरात दरोडा टाकण्यासाठी दोन पल्सर मोटारसायकलवर आलेल्या चार चोरट्यांची माहिती एकाने फोनवरुन पहाटे तीनच्या सुमारास घारगाव पोलिस ठाण्याला कळवली. रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिस गाडीतील पोलिसांनी पाठलाग करुन ताब्यात घेतलेला गुन्हेगार नाशिक जिल्ह्यातील मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

फोनवरुन समजलेली माहिती गस्त घालणाऱ्या पेट्रोलिंगच्या गाडीला कळताच, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पोलिसांची चाहुल लागल्याने डोळासणे गावातून दोन मोटारसायकल भरधाव वेगाने नाशिक पुणे महामार्गाच्या दोन बाजूला गेल्या. त्यातील एक सतीची वाडी या दिशेने गेली, तर दुसरी मॉन्टे कार्लोच्या ऑफीसच्या दिशेने गेली. मात्र, पुढे रस्ताच नसल्याने मोटारसायकल तिथेच सोडून आरोपींनी पळ काढला. पाठलागावर असलेल्या पोलिसांनी त्यातील एकाला दारोड्याची हत्यारे व पल्सरसह शिताफीने ताब्यात घेतले. दुसऱा मात्र फरार झाला. या धावपळीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे.

आज दिवसभर संशयित आरोपीची घारगाव पोलिसांनी कसून चौकशी केली. ताब्यात असलेला संशयित आरोपी संदीप खंडू पवार (वय 31 रा. नांदगाव) नाशिक जिल्ह्यातील असून, त्याच्यावर नाशिक ग्रामीण पोलिस ठाण्यात १२ पेक्षा अधीक गुन्हे दाखल असल्याचे समजते. देवळाली, चांदवड, लासलगाव, घोटी, इगतपुरी परिसरात रस्तालुट करण्यात त्याचा हातखंडा आहे. तो दोनच महिन्यांपूर्वी मोक्कातून सुटला होता. त्याचे फरार झालेले साथीदार मध्यप्रदेशातील सराईत गुंड आहेत. त्याने उद्या नगर येथे नागमण्याचा सौदा सुमारे ४० लाख रुपयात होणार असल्याची माहिती दिली आहे. या बाबत घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्रमांक 36 / 18  प्रमाणे भादवी. कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

गेल्या दोन वर्षात घारगाव परिसरात झालेल्या अनेक चोऱ्यांचा तपास पोलिसांना लावण्यात अपयश आले होते. मात्र या आरोपीच्या रुपाने प्रथमच मोठे यश घारगाव पोलिसांच्या पदरी पडले आहे. उपविभागीय पोलिस अधीकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अन्सार इनामदार, उपनिरीक्षक मंगलसिंग परदेशी, पो. कॉ, नामदेव बिरे, राजू वायकर यांनी त्याला पकडले. पुढील तपास हेड काँस्टेबल संजय विखे करीत आहेत.

Web Title: dangerous thief caught by police in nagar