विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला ; कृष्णानगरमध्ये धोकादायक वाहतूक 

तेजस सुपेकर
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

या पुलाला संरक्षक कठडे नाहीत. त्याच्या पुढील व मागील बाजूचा रस्ता खचलेला आहे. पुलाची दुरुस्ती करण्यासाठी केलेली मलमपट्टीही निघून गेली आहे. धोकादायक स्थितीत वाहतूक सुरूच राहिल्याने दुर्दैवी घटना घडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. ते टाळण्यासाठी पाटबंधारे प्रशासनाने पुलाची दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे. 

 

सातारा  : अपघातांच्या घटना वारंवार घडत असून, यात अनेक स्कूल बसचा समावेश आहे. अशा घटनांत अनेक विद्यार्थ्यांचे जीव पणाला लागले. मात्र, पैसा, इंधनाची बचत करण्याच्या मोहापायी अजूनही अनेक ठिकाणी बेशिस्तपणे वाहतूक सुरूच असते. शहरालगत कृष्णानगर येथील एका कॅनॉलच्या पुलावरून अनेक स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची धोकादायकरित्या वाहतूक सुरू आहे. 
सातारा शहर व परिसरातील अनेक शाळांसाठी विविध भागांतून स्कूल बसद्वारे विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. या स्कूलमध्ये क्षमतेपेक्षाही जादा मुलांची वाहतूक सुरू असते. मात्र, त्याकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उघडपणे दुर्लक्ष सुरू आहे. या स्कूल बस सोसायट्या, कॉलन्यांमध्ये जावून विद्यार्थ्यांना शाळांपर्यंत घेऊन जातात. पुन्हा त्याच बसमार्फत विद्यार्थ्यांना पुन्हा घरापर्यंत सोडले जाते. परंतु, यात विद्यार्थ्यांचे किती हाल होतात, याकडे ना पालकांचे लक्ष असते, ना शाळांचे. 
कृष्णानगरमधून कॅनॉल वाहत आहे. त्या कॅनॉलवर वाई अर्बन बॅंकेच्या शाखेपासून औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर साकव पूल आहे. संगमनगरमधील गुरुदत्त कॉलनी, अश्‍विनी पार्क, दुर्वाश्‍विनी पार्क, संगमनगर कॉलनीसह विविध सोसाट्या, कॉलन्यांमधील विद्यार्थी सातारा शहर व महामार्गाजवळील शाळांमध्ये शिकण्यास जातात. त्यामुळे या विद्यार्थ्यांची वाहतूक स्कूल बसमधून याच पुलावरून धोकादायकरित्या सुरू आहे. पैसा व इंधनाची बचत होण्यासाठी या मार्गाचा अवलंब केला जात असल्याचे नागरिक सांगतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangerous transportation from Krishnanagar bridge