वारली चित्रकलेतून सामाजिक संदेश देणारे घर

वारली चित्रकलेतून सामाजिक संदेश देणारे घर

कोल्हापूर - मंगळवार पेठ, शिवाजी पेठ या पेठांतील घरे म्हणजे जुन्या गल्लीबोळातली घरे. या छोट्या गल्ल्यांमधून दगडी बांधकामाची घरे आजही दिसत असतात. या काँक्रिटच्या जंगल होत असलेल्या अपार्टमेंटच्या गर्दीत मात्र पोवार गल्लीच्या कोपऱ्यावर एक जुने घर दिसते. या कौलारू घराकडे नजर पडताच क्षणभर डोळे त्या घरावरच विसावतात. प्राचीन वारली चित्रकलेचे जणू प्रदर्शनच या घरावर दिसते. ग्रामीण जीवनाचेच दर्शन आणि त्यातूनच सामाजिक संदेशाचे दर्शन होते. ही कलाकृती साकारणाऱ्या दर्शना मंडलिकने आपल्या घरावर या पारंपरिक कलेच्या आधारे लोकांना लेक वाचवा, झाडे लावा, याबरोबरच आरोग्यदायी जीवनाच्या गुरुकिल्लीचाही संदेश दिला आहे.

मंगळवार पेठेत डॉ. नंद मंडलिक यांचे पारंपरिक घर आहे. या घराची दर्शनी बाजूही रंगाअभावी खराब दिसत होती. कोडोलीसारख्या ग्रामीण भागातील शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करताना दर्शनाने अनेक घरांसमोरील सारवलेली अंगण आणि कोठेतरी घराच्या भिंतीवर वारली चित्रकृती पाहिल्या होत्या. 

मंडलिक परिवारातील सर्वजण कलाप्रेमी, गणेश उत्सव म्हणजे या कुटुंबाचा कलाआनंदोत्सवच असतो. यापूर्वी थर्माकोलद्वारे भव्य कलात्मक मकर केले जात होते. ते पाहण्यासाठी आसपासचे लोकही यायचे. आता पुठ्ठ्याद्वारे मकर सजावट केली जाते. चित्रकलेचे कोणतेही वेगळे शिक्षण न घेतलेल्या दर्शनाने मात्र वेगळे काहीतरी करायचे म्हणून संभाजीनगरमधील घराची दर्शनी भिंत वारली चित्रांनी सजवली. यातून ग्रामीण जीवनशैली मांडली. झोपडी, बैलगाडी, विहिरीवरील महिला, शेतीकामे, सुगीचा आनंदोत्सव साजरी करणाऱ्या महिला, अशा चित्रांनी काही दर्शनी भाग सजवला; पण मंगळवार पेठेतील दवाखाना इमारत मात्र जुन्या पद्धतीची रंग उडालेली होती. त्यामुळे दर्शना आणि तिची कॅनडास्थित असलेली सुटीसाठी भारतात आलेली बहीण नीलिमा पुटलीपट्टु यांनी दवाखान्याचा दर्शनी भाग रंगवायचा निर्णय घेतला. 

त्यांना या कामात मैत्रीण वेदिका शिंदे हिने मोठी मदत केली; पण केवळ सजावटीपेक्षा यातून काही सामाजिक संदेश देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रथम वारली कलेचाच आधार घेत ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ संदेश रेखाटला. त्याचप्रमाणे निसर्गाचे रक्षण करावे, पाणी बचत, झाडे लावा झाडे जगवा, अशा संदेशासाठीही चित्रांसोबत स्लोगनचा आधार घेतला. दर्शनाचे वडील डॉक्‍टर असल्याने दवाखान्यात येणाऱ्या पेशंटची संख्याही मोठी असते. त्यामुळे या लोकांना वेगळेपण दिसावे, ही यामागची भूमिका होती. शिवाय, आरोग्यम धनसंपदा या म्हणीप्रमाणे सर्वसामान्यांना आरोग्याविषयी काळजी घेण्यासाठी चित्रांद्वारे समृद्ध आरोग्याची गुरुकिल्ली कोणती, याचाही संदेश चित्ररूपी चक्राद्वारे दिला. यामध्ये सकारात्मक विचार करा, ताजे अन्न खावे, समाधानी राहावे, व्यायाम करावा, तरच आरोग्य तंदुरुस्त राहील, असे चक्रच भिंतीवर साकारले आहे. मंगळवार पेठेतील सुमारे तीस फुटांची भिंत आहे. या भिंतीवर लहानशी शिडी आणि टेबलचा आधार घेऊन या तिघींनीच ही चित्रकृती साकारली. 

रस्त्याने ये-जा करणारे नागरिकही घरासमोर उभे राहून मोबाईलमध्ये फोटो घेताना पाहिले, की मनाला केलेल्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटते. काम करताना काही जण हॉटेल काढणार का विचारत होते; पण आता मात्र होत असलेल्या कौतुकाने आनंद वाटतो. 
- दर्शना मंडलिक

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com