सज्जनगडावर दासनवमी उत्सवास प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

सातारा - काकड आरती, अभिषेक, पूजा याबरोबरच सुरात म्हटलेल्या श्‍लोकोच्चारात समाधी मंदिराला तालबद्धपणे घालण्यात येत असलेल्या अकरा मंदिर प्रदक्षिणा आणि प्रभू रामचंद्र आणि समर्थांच्या घोषात सज्जनगडावर दासनवमी उत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. 

सातारा - काकड आरती, अभिषेक, पूजा याबरोबरच सुरात म्हटलेल्या श्‍लोकोच्चारात समाधी मंदिराला तालबद्धपणे घालण्यात येत असलेल्या अकरा मंदिर प्रदक्षिणा आणि प्रभू रामचंद्र आणि समर्थांच्या घोषात सज्जनगडावर दासनवमी उत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. 

सज्जनगड येथे या उत्सवासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. दासनवमी उत्सवानिमित्त सज्जनगडावर श्री रामदास स्वामी संस्थान आणि समर्थ सेवा मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटेपासून या कार्यक्रमांना सुरवात होते. संस्थानच्या वतीने समाधी पूजनानंतर श्रीराम मंदिराच्या सभागृहात संस्थानचे अध्यक्ष अभिराम स्वामी यांच्या प्रवचनाने उत्सवातील कार्यक्रमांना नुकताच प्रारंभ झाला. हे कार्यक्रम आता दासनवमीपर्यंत (ता. 20) सुरू राहणार आहेत. गडावर संस्थान आणि समर्थ सेवा मंडळाच्या वतीने आयोजित भजन, कीर्तनाबरोबर नामवंत गायकांच्या शास्त्रोक्‍त गायनाला भाविकांचा प्रतिसाद मिळत आहे. 

दरम्यान, दासनवमी दिवशी राज्याच्या विविध भागांतील भाविक मोठ्या संख्येने गडावर येतात. हे लक्षात घेऊन संस्थानतर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सर्व गडावर, तसेच गडाच्या पायऱ्यांची नुकतीच स्वच्छता करण्यात आली असल्याची माहिती अभिराम स्वामी यांनी दिली. भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही पुरेशी करण्यात आली आहे, तसेच राज्य परिवहन विभागाच्या वतीने जादा गाड्याचेही नियोजन केले आहे. 

दरम्यान, गडावर जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची नुकतीच डागडुजी करण्यात आली आहे. मात्र संपूर्ण रस्ताच नव्याने करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Dasanavami celebrate on Sajjangad

टॅग्स