गुंड दत्ता जाधवला अटक 

गुंड दत्ता जाधवला अटक 

सातारा - खंडणी, सांगलीतील पोलिस पथकावरचा हल्ला यासह "मोका'च्या कारवाई अंतर्गत पोलिसांना हवा असलेल्या गुंड दत्ता जाधवच्या मुसक्‍या आज सातारा पोलिसांनी आवळल्या. त्याची दहशत असलेल्या प्रतापसिंहनगरातून पोलिसांनी त्याची भर रस्त्यातून वरात काढत रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात आणले. सांगली जिल्ह्यातील कारवाईवेळी पोलिस पथकावर हल्ला करून पसार झालेल्या दत्ताचे आव्हान स्वीकारत सातारा पोलिसांनी अवघ्या दहा दिवसांत त्याला जेरबंद करण्याची कामगिरी करून दाखवली. 

सातारा शहरालगतच्या शेतजमिनीचे प्रकरण मिटवून देण्यासाठी खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात प्रतापसिंहनगरमधील दत्ता जाधवसह त्याच्या टोळीवर "मोका' कायद्यानुसार (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा) कारवाई करण्यात आली. मार्चमध्ये त्याला "मोका' लागला. तेव्हापासून पोलिसांना तो हवा होता. सांगली जिल्ह्यातील प्रतापपूर (ता. जत) येथे 25 एप्रिल रोजी उत्सव होता. त्यामध्ये दत्ता साथीदारांसह गेला होता. त्याची कुणकुण आधीपासूनच सातारा पोलिसांना असल्याने त्यांनी सांगली पोलिसांसह फिल्डिंग लावली होती. मात्र, उरसात तमाशा सुरू असतानाच पोलिसांनी छापा टाकल्यानंतर गोंधळ उडाला. जाधव टोळीतील गुंडासह महिलांनी दगडफेक केली. महिला पोलिसांचा गळा आवळून मारण्याचा प्रयत्न झाला. या गोंधळात दत्ता पसार झाला होता. 

पोलिसांवरील हल्लाप्रकरणी कालच सातारा पोलिसांनी दत्ताच्या दोन साथीदारांना खेडमधून अटक केली. त्यानंतरही पोलिसांचे प्रतापसिंहनगरावर लक्ष होते. दत्ता नगरातच असल्याची पक्की टिप पोलिसांना होती. जतचा अनुभव पाठीशी असल्याने यावेळी सातारा पोलिसांनी मोठी तयारी केली. 

फलटण ग्रामीणचा पदभार असलेले परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक पवन बन्सोड, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक पद्‌माकर घनवट, सातारा शहरचे निरीक्षक नारायण सारंगकर, वाठार स्टेशनचे सहायक निरीक्षक मयूर वैरागकर, विकास जाधव, उपनिरीक्षक शशी मुसळे, सागर गवसणे आदी अधिकारी सुमारे 50 कर्मचाऱ्यांसह सर्व शक्‍यता गृहीत धरून तयारीनिशी प्रतापसिंहनगरात पोचले. सायंकाळी साडेचार वाजता प्रतापसिंहनगरमध्ये झडतीसत्र सुरू झाले. नगरातील बहुतांश घरे बंदच होती. दत्ताचेही घर तपासण्यात आले. हाती काहीही न लागल्याने रात्री सात वाजता पोलिस फाटा नगरातून हात हलवत बाहेर पडला. सगळे जिथल्या तिथं झाल्याचे वातावरण तयार झाले असताना अर्ध्या तासात पोलिस पुन्हा नगरात घुसले. त्यांनी संशयावरून एका बंद घराचे कुलूप तोडले असता आतमध्ये दत्ता जाधव मिळून आला. 

दत्ताला ताब्यात घेतल्यानंतर काही लोकांनी, विशेषत: महिलांनी दंगा करण्याचा प्रयत्न केला. त्याने काय खून-मारामाऱ्या केल्या आहेत का? त्याला का पकडून नेता? असे प्रश्‍न उपस्थित करत रडारड सुरू झाली. महिला पोलिस पुढे सरसावल्यानंतर रडारडीचा आवाजही बंद झाला. दत्ताचा भाऊ युवराज, भावजय आदींसह 12 जणांना पोलिसांवरील हल्ल्याप्रकरणी याधीच अटक झालेली असल्याने प्रतापसिंहनगरातून विरोधाची धार बोथट झाली होती. 

दत्ता जाधवची दहशत असलेल्या प्रतापसिंहनगरातून विकासनगरपर्यंत व पुन्हा पोवई नाक्‍यावरून शहर पोलिस ठाण्यापर्यंत दत्ता जाधवची पोलिसांनी चालत रस्त्यावरून वरात काढली. रात्री उशिरा त्याला शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, वाठार स्टेशन व शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी सहभागी झाले होते. 

दत्ता जाधवची "हवा'...  
रात्री साडेसात वाजता पोलिस फाटा पुन्हा प्रतापसिंहनगरात शिरला. दत्ता जाधवच्या घराजवळ तीन-चार घरे लागून एक घर कुलूपबंद होते. मात्र, आतील विजेचे दिवे सुरू होते. पोलिसांना संशय आला. त्यांनी शेजारपाजारी चौकशी केली. चुकून दिवे सुरू राहिले असतील, अशी सारवासारव झाली. तरी पोलिसांनी त्या घराला घेरले. पाठीमागील दारे, खिडक्‍या तपासून पोलिसांनी घराचे कुलूप फोडले अन्‌ पाहतात तर काय आतमध्ये दत्ता जाधव फॅनची हवा खात बसला होता. पोलिसांना पाहिल्यानंतर तो शांतपणे स्वाधीन झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com