NCP-BJP
NCP-BJP

'या' मतदारसंघात दोन्ही उमेदवारांनी उधळला गुलाल; काय आहे कारण?

यवत : दौंड विधानसभा निवडणुकीचा निकाल औत्सुक्‍याचा आणि अफवांचा विषय राहिला होता. सायंकाळी तर रमेश थोरात विजयी झाल्याच्या अफवेने अनेक गावांमध्ये उत्साही कार्यकर्त्यांनी गुलालही उधळण्यास सुरवात केली. तसेच काही तरूणांनी दुचाकी रॅलीही काढली. त्यांना आवरता आवरता प्रमुख कार्यकर्त्यांची पुरेवाट झाली. 

शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास मतमोजणीला सुरवात झाली. पहिल्या फेरीत कुलांनी साडेचार हजाराहून अधिक मतांची घेतलेली आघाडी तिसऱ्या फेरीत आठ हजारांपर्यंत पोहोचली. त्या पुढील फेऱ्यांमध्ये ही आघाडी टप्प्याटप्प्याने कमी होत गेली. अखेरच्या बाविसाव्या फेरीत आघाडीचा हा पारा उतरून 746 वर येऊन थांबला.

या दरम्यान तालुकाभर अफवांच्या पिकांनी जोम धरला होता. धिम्या गतीने मतमोजणीची प्रक्रिया सुरू राहिल्याने तालुकाभर आफवांना उत येत आला होता. विसाव्या फेरीत ही आघाडी 525 पर्यंत खाली आली होती. यावेळी अफवा पसरवणाऱ्यांना चांगलाच जोर आला होता, शेवटची फेरी संपल्यावर कुल यांच्या विजयाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि गुलाल खेळत असलेल्या उत्साही कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला.

त्यानंतर बातमी पसरली की मतमोजणीत गडबड झाली आहे. त्यामुळे फेरमतमोजणी घेतली जाणार आहे. त्यासाठी अजित पवार स्वतः दौंडमध्ये दाखल झाले आहेत. अनेक गावांमधून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दौंडकडे धाव घेण्याची तयारी सुरू केली. काही कार्यकर्ते पोहोचलेही. मात्र, सायंकाळी सहाच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून कुलांच्या विजयाची घोषणा करण्यात आली. आणि दिवसभरांच्या अफवांवर एकदाचा पडदा पडला.

दरम्यान अनेक गावांमध्ये उत्साही कार्यकर्त्यांनी रमेश 
थोरात निवडून आल्याच्या आनंदात गुलाल उधळला होता. त्यामुळे 'कुलांच्या विजयाचा गुलाल विरोधकांनीही उधळला' अशी चर्चा समाज माध्यमांवर सुरू झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com