कोल्हापुरातच मिळणार ‘शव शीत पेटी’

सुधाकर काशीद
गुरुवार, 4 एप्रिल 2019

शीत शवपेटीची संकल्पना जगभर आहे. आम्ही स्वतः त्याची निर्मिती करतो; पण खुद्द कोल्हापुरात मात्र अशी शीत शवपेटी उपलब्ध नव्हती. म्हणून आम्ही ही सेवा सुरू केली आहे. त्यात मृतदेह व्यवस्थित, संसर्गविरहित राहू शकतो. कोल्हापूरकरांची द:खद प्रसंगात सेवा करण्याचे एक काम या निमित्ताने आम्ही केले आहे.
- राजेंद्र हवालदार, दामिनी हवालदार.

कोल्हापूर - मृतदेहावर अंत्यसंस्कार वेळेत होणे आवश्‍यक असते, पण काही कारणाने अंत्यसंस्काराची वेळ लांबते. अशा वेळी मृतदेह शीतगृहात नेऊन ठेवायची वेळ येते आणि अंत्यसंस्कारासाठी तेथून मृतदेह पुन्हा घरी घेऊन आणावा लागतो, या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आता कोल्हापुरातच ‘शव शीत पेटी’ सेवा उपलब्ध झाली आहे.

ही शीतपेटी घरातच ठेवता येते. या शीतपेटीला बाजूने काच असल्याने मृतदेहाचे दर्शनही घेता येते. या शीत पेटीतील तापमान शून्य अंशाच्या खाली असल्याने मृतदेहाची हेळसांड होत नाही. मृतदेहापासून संसर्ग होत नाही. काही कारणाने अंत्यसंस्कारासाठी जवळचे नातेवाईक येण्यास उशीर झाल्यास, ते येईपर्यंत मृतदेह ठेवणे यामुळे शक्‍य झाले आहे.

खासगी दवाखान्यात मृत्यू झाल्यास त्या दवाखान्यातून तत्काळ मृतदेह नेण्यास नातेवाइकांना सांगितले जाते. मृतदेह घरी नेला तरी त्यावर तातडीने अंत्यसंस्कार होणे आरोग्याच्या दृष्टीने 
महत्त्वाचे असते; पण अनेक कुटुंबांत अजूनही बाहेर गावी असलेला मुलगा, मुलगी किंवा अन्य जवळचे नातेवाईक आल्याशिवाय अंत्यसंस्कार केले जात नाहीत. मध्यरात्रीच्या वेळी अंत्यसंस्कारासाठी सर्वांना बोलावता येणे शक्‍य नसल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी अंत्यसंस्काराचे नियोजन केले जाते. अशा वेळी इतका वेळ मृतदेह कोठे ठेवायचा? ही मोठी समस्या असते. 

सीपीआर हॉस्पिटलच्या शवागारात मृतदेह ठेवण्याची सक्षम यंत्रणा नाही. त्यामुळे बहुतेक वेळा मृतदेह डी. वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये ठेवावा लागतो. पुन्हा अंत्यसंस्कारासाठी तो मृतदेह घरी आणावा लागतो. 

पेटीची रचना अशी
शव शीतपेटीची सोय झाल्याने ही शवपेटी कोल्हापुरातच भाड्याने मिळू शकणार आहे. ही शवपेटी सहा फूट लांबीची आहे. ती घरगुती वीज कनेक्‍शनवर चालू शकते. ही पेटी भाड्याने आणली की त्यात मृतदेह ठेवता येतो. शीतपेटीतील थंड तापमानामुळे मृतदेह व्यवस्थित राहू शकतो. याशिवाय शीत पेटीवर काच असल्याने मृतदेह सर्वांना पाहताही येतो. 

शीत शवपेटीची संकल्पना जगभर आहे. आम्ही स्वतः त्याची निर्मिती करतो; पण खुद्द कोल्हापुरात मात्र अशी शीत शवपेटी उपलब्ध नव्हती. म्हणून आम्ही ही सेवा सुरू केली आहे. त्यात मृतदेह व्यवस्थित, संसर्गविरहित राहू शकतो. कोल्हापूरकरांची द:खद प्रसंगात सेवा करण्याचे एक काम या निमित्ताने आम्ही केले आहे.
- राजेंद्र हवालदार, दामिनी हवालदार.

Web Title: Dead body preservation box available in Kolhapur