भेडसगावमध्ये घोटला 'नकुशी'चा गळा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

भेडसगाव - शाहूवाडी तालुक्‍यात आज भेडसगाव येथे आणखी एका नकुशीचा गळा घोटल्याचा प्रकार उघडकीस आला. अंदाजे दोन दिवसांपूर्वी जन्मलेले हे स्त्रीजातीचे मृत अर्भक काल (ता. १४) तळ्यात टाकले असावे, अशी शक्‍यता डॉक्‍टरांनी व्यक्त केली आहे. 

भेडसगाव - शाहूवाडी तालुक्‍यात आज भेडसगाव येथे आणखी एका नकुशीचा गळा घोटल्याचा प्रकार उघडकीस आला. अंदाजे दोन दिवसांपूर्वी जन्मलेले हे स्त्रीजातीचे मृत अर्भक काल (ता. १४) तळ्यात टाकले असावे, अशी शक्‍यता डॉक्‍टरांनी व्यक्त केली आहे. 

चार दिवसांपूर्वी तालुक्‍यातीलच सावर्डी येथे एका मुलीचा गळा घोटला होता. लागोपाठ या दोन घटनांनी तालुक्‍यात खळबळ उडाली असून, शाहूवाडी पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आज सकाळी येथील अंगाई (भवानी) तलावाच्या काठावरून जात असताना काही ग्रामस्थांना एक मृत अर्भक पाण्यावर तरंगताना दिसले. काही वेळात ही माहिती वाऱ्यासारखी गावभर पसरली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. पोलिसपाटील प्रदीप तांबे यांना ही माहिती समजताच त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी याची माहिती शाहूवाडी पोलिस ठाण्यात दिली.

त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक महादेव जठार व कॉन्स्टेबल शाहू कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांच्या समोरच उमेश गोसावी व विनोद गोसावी यांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यानंतर भेडसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जी. के. पाडवी यांच्यासह सर्व कर्मचारी, आशा सेविकांनी मृतदेहाची पाहणी करून नेर्लेच्या पोलिसपाटील दीपाली गवळी, प्रशांत नाईक, प्रशांत चौगले, अमर पाटील, आदींच्या उपस्थितीत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर येथील ग्रामीण आरोग्य रुग्णालयात पाठविला.

अर्भक अंदाजे दोन दिवसांपूर्वी जन्मलेले असून, प्रसूती झालेल्या आणि होणाऱ्या मातांची माहिती घेतली जात असून, सर्व आशा सेविकांना त्याबाबतची माहिती घेण्यास सांगितले आहे. परिसरातील शित्तूर व सरूड येथील आरोग्य केंद्रातूनही प्रसूतीपूर्व मातांची माहिती मागवली जात आहे.
- डॉ. जी. के. पाडवी, वैद्यकीय अधिकारी, भेडसगाव

सावर्डी व भेडसगाव या घटना भयंकर असून, दोन-तीन महिन्यात प्रसूती होणाऱ्या मातांची माहिती घेण्यास भेडसगाव आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्याचबरोबर ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ याबाबत शाळांत जनजागृती करणार आहोत.
- डॉ. एच. आर. निरंकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, शाहूवाडी

भेडसगाव आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांना भेडसगावसह आसपासच्या गावातील प्रसूती झालेल्या, तसेच होणाऱ्या मातांची माहिती घेण्यास सांगितले असून, बाहेरून ऊसतोडणीसाठी आलेल्या टोळ्यांची तपासणी करणार आहोत. घटनेचा प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तपास केला जाईल.
- महादेव जठार, पोलिस उपनिरीक्षक, शाहूवाडी

घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, याचा सर्व यंत्रणांमार्फत तपास केला जाईल. ज्याने कोणी गावाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यास कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करू. अशा घटना गावात पुन्हा घडू नये, यासाठी प्रयत्न केला जाईल.
- अमरसिंह पाटील, सरपंच, भेडसगाव

Web Title: dead Infant found in Bhedasgaon