मार्केट यार्डजवळ फळ विक्रेत्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

कोल्हापूर - मार्केट यार्ड येथील फूटपाथवर फळ विक्रेता आज सकाळी बेशुद्धावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळला. सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. केरबा अर्जुन कांबळे (वय ४५, रा. शेणवडे, ता. गगनबावडा) असे त्यांचे नाव आहे. त्यांचा अपघाती अगर नैसर्गिक मृत्यू नसून तो खून असल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्‍त केला. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत नातेवाईक व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, श्री. कांबळे मूळचे शेणवडे (ता. गगनबावडा) येथील रहिवासी आहेत. त्यांना रामचंद्र व संदीप ही दोन मुले. ते दोघेही गावातच सेंट्रिंग काम करतात. त्यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. गेली अनेक वर्षे ते शहरात फळ आणि बांबू विक्रीचा व्यवसाय करत होते. दहा-पंधरा दिवसांपूर्वी ते व्यवसायानिमित्त घरातून बाहेर पडले. सध्या ते मार्केट यार्डसमोरील फूटपाथवर फणस विक्रीचा व्यवसाय करत होते. रात्री ते तेथेच राहायचे.

आज सकाळी फूटपाथवर विक्रेता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांच्या डोक्‍यात, मानेला आणि हनुवटीजवळ जखमाही होत्या. शाहूपुरी पोलिसांनी त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ओळख पटवून त्यांच्या नातेवाइकांना माहिती दिली. दुपारी नातेवाईक सीपीआरमध्ये दाखल झाले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

फळ विक्रीतून कांबळे यांची दररोज १० ते १५ हजारांची उलाढाल होत होती. त्यांच्याकडे रोकडसह मोबाईल, एटीएम कार्ड, ओळखपत्रही असायचे; मात्र घटनास्थळी पोलिसांना काहीच मिळाले नाही. त्यांचा अपघाती अगर नैसर्गिक मृत्यू झाला नसून पैशासाठी खून झाला असावा, असा संशय त्यांच्या मुलांसह नातेवाइकांनी व्यक्त केला. याबाबतची तक्रारही पोलिस ठाण्यात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मागे आई व दोन मुले असा परिवार आहे.

Web Title: Death of fruit vendor near market yard