विजेच्या धक्‍क्‍याने पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

पालिकेच्या अखत्यारीतील काम करण्यास भाग पाडून या मृत्यूला पालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप ओमासे कुटुंबियांनी केला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की या दफनभूमीतील कुपनलिका बंद असल्याची तक्रार विश्‍वस्थांनी या परिसरातील लोकप्रतिनिधींकडे केली होती.

मिरज : येथील इदगाहनगरातील मुस्लिम दफनभूमीतील कुपनलिकेचा वीज पुरवठा सुरळीत करताना विजेचा धक्का बसून महापालिकेचा कर्मचारी संजय तुकाराम ओमासे (वय 45, रा.बेडग) यांचा मृत्यू झाला. आज सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.

पालिकेच्या अखत्यारीतील काम करण्यास भाग पाडून या मृत्यूला पालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप ओमासे कुटुंबियांनी केला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की या दफनभूमीतील कुपनलिका बंद असल्याची तक्रार विश्‍वस्थांनी या परिसरातील लोकप्रतिनिधींकडे केली होती. त्यांच्या आदेशामुळेच संजय ओमासे आणि त्याचा सहकारी स्मशानभुमीकडे गेले. एकंदर स्थिती पाहता हे काम खासगी असल्याने आपण करणार नाही असे ओमासे आणि त्याच्या सहकाऱ्यांचा पवित्रा होता. अधिकाऱ्यांनीही मात्र ते काम करण्याच आग्रह धरला.

ओमासे खांबाजवळ तारेचा गुंडाळा घेऊन उभे होते. त्यांचे अन्य एक सहकारी खांबवर होते. कामाच्या गडबडीत तारेचा प्रवाहित तारेशी संपर्क झाला आणि ओमासे यांना तीव्र धक्का बसला. ते जागीच कोसळले. त्यांना रुग्णालयात नेले मात्र तत्पुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, ओमासे हे पालिकेत हेल्पर म्हणून काम करतात. कुपनलिका दुरुस्तीचा पालिकेच्या कामकाजाशी संबंध येत नाही. त्यामुळे हे काम बेकायदेशीर ठरते. 

संबंधित लोकप्रतिनिधी आणि आधिकाऱ्यांच्या मनमानीमुळेच हा बळी गेल्याचा आरोप ओमासेच्या कुटुबियांनी केला. या सर्वांविरुध्द मृत्युस जबाबदार ठरविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचेही नातेवाईकांनी सांगितले. आमदार सुरेश खाडे यांनीही ओमासेच्या कुटुबियांची भेट घेऊन या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या सर्वाविरुध्द कारवाईसाठी आग्रह धरू असे अश्‍वासन दिले. 

Web Title: Death of municipal employee by electric shock