नाशिकच्या धरणात बुडून यावलच्या तरुणाचा मृत्यु

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

किनगावातील तरुण युवकांच्या दुर्देवी मृत्यूची महिन्यानंतरची ही दुसरी घटना आहे.

यावल : तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील रहिवासी राहूल जगन्नाथ वराडे या वीस वर्षीय तरूणाचा नाशिक येथील गंगापूर धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना काल (ता. 1) घडली आहे. तो कुटुंबात एकूलता मुलगा होता. किनगावातील तरुण युवकांच्या दुर्देवी मृत्यूची महिन्यानंतरची ही दुसरी घटना आहे.

किनगाव बुद्रुक (ता. यावल) येथील रहिवासी जगन्नाथ महिपत वराडे यांचा मुलगा राहूल वराडे हा गेल्या काही महिन्यांपासून नाशिक येथे खासगी कंपनीत काम करीत होता. मंगळवारी महाराष्ट्र दिनाची सुटी असल्याने तो आपल्या मित्रांसोबत नाशिक जवळील गंगापूर धरणात पोहण्यास गेला होता. दुपारी दोनच्या सुमारास धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्‍याचा बुडून मृत्‍यू झाला. त्‍यानंतर राहुलच्‍या मित्रांनी ताबडतोब याबाबत पोलिसांना माहिती दिली. राहुलजवळील आधारकार्डवरून फैजपूरचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरिक्षक सार्थक नेहेते यांनी किनगावचे माजी सरपंच मिलींद चौधरी यांना याबाबत माहिती दिली. तेव्‍हा राहूल हा किनगावातील जगन्नाथ वराडे यांचा मुलगा असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह धरणातुन बाहेर  काढून शवविच्छेदनानंतर रात्री उशीरा तो कुटुंबीयांच्या ताब्यात दिला गेला.

आज सकाळी किनगावात त्याच्यावर अंत्‍यसंस्कार करण्यात आले. मृत युवक हा कुटुंबातील एकुलता मुलगा होता. त्यांच्या पश्चात आई, वडील एक विवाहित बहिण असा परिवार आहे. यापूर्वी दोन मार्चला किनगाव येथील श्रीराम संतोष पाटील या युवकाचा सुरत जिल्ह्यात तापी नदीपात्राचे डोहात बुडून मृत्यू झाला आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The death of the young man drowning in the dam in Nashik