इचलकरंजी मतदारसंघावर राष्ट्रवादीने केलेला दावा हस्यास्पद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

इचलकरंजी - राष्ट्रवादी काँग्रेसने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याची केलेली मागणी निव्वळ हास्यास्पद आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कॉंग्रेसकडेच ठेवण्यासाठी इचलकरंजी पालिकेचे कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी आज दिली.

इचलकरंजी - राष्ट्रवादी काँग्रेसने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याची केलेली मागणी निव्वळ हास्यास्पद आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कॉंग्रेसकडेच ठेवण्यासाठी इचलकरंजी पालिकेचे कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी आज दिली.

मुंबई येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत इचलकरंजीतील नगरसेवकांनी राष्ट्रवादीकडे इचलकरंजी विधानसभा मतदार संघ देण्याची मागणी केली आहे. यावर आज श्री. बावचकर यांनी माहिती दिली. 

श्री. बावचकर म्हणाले, "" काही अपवाद वगळता स्वातंत्र्यानंतरच्या काळात इचलकरंजी विधानसभा मतदारसंघावर सातत्याने कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. कॉंग्रेस पक्षानेही विविध विकासकामांच्या माध्यमातून भागाचा सर्वागिण विकास केल्याने या मतदारसंघावर प्रामुख्याने कॉंग्रेसचाच हक्क आहे. केवळ राजकारण म्हणून नव्हे तर सहकार चळवळीच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षाने या मतदारसंघात अनेकविध विकासाची कामे, रोजगार निर्मिती, शिक्षण व्यवस्था यावर भर देऊन मतदारसंघाचा सर्वागिण विकास केलेला आहे. 2009 च्या विधानसभा निवडणूकीत या भागात झालेल्या दंगलींचा फायदा घेऊन काही पक्षांनी या मतदारसंघात आपला झेंडा रोवला. परंतु, गत दहा वर्षात त्यांच्याकडून कोणतीही भरीव विकासकामे न झाल्याने इचलकरंजीच्या जनतेला तीव्रतेने पुन्हा कॉंग्रेसची आठवण होऊ लागली आहे.''

श्री. बावचकर म्हणाले, ""मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आढावा बैठकीत राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने इचलकरंजी विधानसभा राष्ट्रवादीकडे ठेवण्याची मागणी केल्याचे वाचून आश्‍चर्य वाटले. 2016 मध्ये झालेल्या इचलकरंजी नगरपरिषदेच्या निवडणूकीमध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शाहू आघाडी अशी निवडणूकपूर्व युती असताना व निवडणूकीत या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडीला मुठमाती देऊन भाजपशी सोयरीक केली. अजुनही पालिकेत राष्ट्रवादी भाजप आघाडीतच सहभागी आहे, असे असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने मागणे हे हास्यास्पद आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांना या मतदारसंघाची इंत्यभूत माहिती असल्याने ते कोणताही चुकीचा निर्णय करणार नाहीत.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Debate between NCP and congress on Ichalkaraji constituency