कर्ज, व्यसनाधीनतेने ५०० तरुणांना घेरले

नागेश गायकवाड 
शनिवार, 10 डिसेंबर 2016

आटपाडी - तालुक्‍यात अधिकाऱ्यांच्या प्रोत्साहनामुळे पाचशेवर तरुण वाळू तस्करीच्या विळख्यात गुरफटले आहेत. वाळू चोरीतून मोजके मोठे झाले, मात्र बहुसंख्य तरुण अधिकाऱ्यांपासून तलाठी आणि पोलिसांच्या हप्त्याच्या जोखडामुळे कर्ज, व्यसनाधीनतेच्या जाळ्यात अडकलेत.

आटपाडी - तालुक्‍यात अधिकाऱ्यांच्या प्रोत्साहनामुळे पाचशेवर तरुण वाळू तस्करीच्या विळख्यात गुरफटले आहेत. वाळू चोरीतून मोजके मोठे झाले, मात्र बहुसंख्य तरुण अधिकाऱ्यांपासून तलाठी आणि पोलिसांच्या हप्त्याच्या जोखडामुळे कर्ज, व्यसनाधीनतेच्या जाळ्यात अडकलेत.

शॉर्टकटने श्रीमंत होण्याची भुरळ तरुणाईला पडली आहे. एखादा यशस्वी होतोही. तोही अवैध मार्गाने. साहजिकच इतरही तोच पत्करतात. साऱ्यांनाच यश येते असे नाही. अपवाद सोडला तर साऱ्यांचे करिअर उद्‌ध्वस्त झाल्याचे प्रकार घडलेत. पंधरा वर्षांपूर्वी काहींनी माणगंगा नदीतून वाळूउपसा करून अल्पावधीत अमाप माया गोळा केली. राहायला बंगला, फिरायला आलिशान गाडी, हाय प्रोफाईल लाइफस्टाइलमुळे अनेक तरुण आकर्षित झाले. अनेकांनी वाळू तस्करी करून हाती काहीच पडत नसल्याचा अनुभव घेऊन या क्षेत्राला कायमचा रामराम ठोकला. मात्र रोज नवीन तरुण यात उतरत आहेत.

माणगंगेमुळे तालुक्‍याला वाळूचे भांडार लाभले आहे. शुकओढा, आटपाडी, निंबवडे तलावातही वाळू मोठी आहे. जवळपास दोनशे वाहनांतून पाचशेवर तरुण वाळू तस्करीच्या विळख्यात सापडलेत. दोनशे वाहनांचे मालक, तेवढेच चालक, मेसेज देणारे शंभरवर फंटर गुंतलेत. हप्ते देऊन शक्‍य तेवढी वाळूउपसा केली जाते. मात्र महिना अखेरीस हाती काहीच उरत नाही. अधिकाऱ्यांना गप्प बसवण्याचे हप्तेही तेवढेच मोठे आहेत. त्यातून काही शिल्लक राहिले तरच बॅंकेचा हप्ता जातो. दिवस-रात्र वाळू ओढून अधिकारी सांभाळण्यात जात असल्यामुळे तरुण कर्ज, व्यसनांच्या जाळ्यात अडकू लागतो. हे म्हणजे पिढी वाया जाण्याचा मोठा धोका आहे.

मिळकतीपेक्षा हप्ते मोठे 
सध्या एका ट्रॅक्‍टरला स्थानिक पन्नास तर वरिष्ठांचा तीस हजार द्यावे लागतात. नंतर कोतवाल, तलाठी, मंडल अधिकारी, पोलिस, स्थानिक फाळकूट टाटा यांना सांभाळण्यात मोठा खर्च होतो. कोतवालापासून तलाठी, चालक, मजुरांना हॉटेलमधील पार्ट्या, टेंन्शनमुळे मालक, फंटरचा रोजचा बीअरबार-हॉटेलचा खर्च वेगळाच. कधी गाडी पकडली तर दंड वेगळा.

Web Title: Debt, addiction about 500 young people

टॅग्स