साताऱ्याच्या दगडी शाळेत मिळणार आठवणींना उजाळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

स्मृतिगंध स्नेहमेळाव्याच्या पुर्णत्वाची जबाबदारी सन 1994-95 बॅचने स्विकारली आहे. 

सातारा : साताराच्या शैक्षणिक क्षेत्रात अढळ स्थान निर्माण केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी (पुणे) संचलित न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस 122 वर्ष पुर्ण होत आहेत. त्यानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा स्मृतिगंध स्नेहमेळावा शुक्रवारी (ता. सहा) सायंकाळी सहा ते आठ यावेळेत शाळेच्या मैदानावर आयोजिल्याची माहिती शालेय समितीची अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 
 
कुलकर्णी म्हणाले डेक्कन एज्युकेशन सोसायटीने दिवाणाची पाग येथे सहा डिसेंबर 1899 रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. पहिले सुपरिटेंडेंट (कै.) सीतारामपंत देवधर यांच्या कार्यकाळात अवघ्या 37 विद्यार्थ्यांसह ही शाळा सुरु झाली. सुशिक्षित व सुसंस्कृत समाजाच्या निर्मितीची मुहूर्तमेढ या निमित्ताने सातारा शहरात रोवली गेली. आज या शाळेत दोन हजार 134 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच शाळेचे असंख्य माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावताना आपल्या शाळेचा व साताऱ्याचा नावलौकिक उंचावला आहे.

दिवाणाची पागा ते सध्याची उत्तुंग दगडी इमारत या प्रवासात शाळेने अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. 19 व्या शतकात सुरु झालेल्या या शाळेचा आज 21 शतकातही दगडी शाळा या संबोधना प्रमाणे भक्कमरित्या ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरु आहे. सातारा शहरातील अनेक पिढ्या या शालामाऊलीने घडविल्या आहेत. आज राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आर्थिक, सामाजिक अशा प्रत्येक महत्वाच्या क्षेत्रात या शाळेचे हजारो माजी विद्यार्थी उल्लेखनीय काम करत आहेत.

ज्या शाळेत आपण शिकलो, बागडलो, खेळलो आपल्या उज्जवल भवितव्याला आकार दिला गेला. त्या न्यू इंग्लिश स्कूलविषयी प्रेम वाटावे यात काही नवल नाही. या शाळेविषयी माजी विद्यार्थ्यांच्या भावना ओंथबून वाहतात. या शाळेत ज्ञानदानाचा यज्ञ अखंड सुरु ठेवणाऱ्या गुरुवर्यांना विद्यार्थ्यांना प्रेमाबरोबरच शिस्तीचे धडेही दिले आहेत.

याच भावना व्यक्त करण्याची आणि शालामाऊलीच्या भेटीची ओढ पुर्णत्वास नेण्यासाठी शुक्रवारी (ता. सहा) शाळेच्या 120 व्या वर्धापन दिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा स्मृतिगंध हा स्नेहमेळावा सायंकाळी सहा ते आठ यावेळेत शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेस मुख्याध्यापक सुनील शिवले, माधव सारडा, ऍड. अश्‍विनी झाड, डॉ. पल्लवी दळवी, अमोल कुलकर्णी, रोहिणी कुलकर्णी, सत्यजीत मोरे यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते.


 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deccan Education Societies New English School Past Students Meet On Six December