कांद्याचा बाजार तेजीत असताना फसवणुकीमुळे उत्पादक ढसाढसा रडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

0 बोगस कांद्याच्या बियाणामुळे लाखो रुपयांचे नुकसान

0 तब्बल 150 ते 200 शेतकऱ्यांची फसवणूक

0 एकरी सात लाखांची भरपाई देण्याची मागणी

0 शेतकऱ्यात खळबळ

वडाळा : वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे बोगस कांद्याच्या बियाणामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तब्बल 150 ते 200 शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ऐन बाजारभाव तेजीत आसताना असा दुर्दैवी प्रसंग घडल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याची मागणी करत शेतकरी अक्षरशः ढसाढसा रडले यामुळे उपस्थितांचे हृदय हेलावले.....! 

वडाळा येथील एका कृषी केंद्रातुन वडाळा , पडसाळी , वांगी , केमवाडी, रानमसले , आदी परिसरातील शेतकऱ्यांनी अमेरिकन हायब्रीड कंपनीचे बियाणे खरेदी केले होते. शेतकऱ्यांनी कांदा लागवड करुन अडीच ते तीन महीने उलटले तरी कांद्याची वाढ होत नसल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल कृषि विभागाच्या तक्रार निवारण समितीने घेतली आहे. आज सकाळी कोरडवाहू संशोधन केंद्राचे पीकशास्रज्ञ टी. एस.भोंडवे, "महाबीज'चे प्रतिनिधी अतुल गेडाम, तालुकास्तरीय तक्रार निवारणा समिती कमिटी सदस्य, समितीचे अध्यक्ष उपविभागीय कृषि अधिकारी यांचे प्रतिनिधी एस. के. होनमाने, के. एन. श्रावस्ती सचिव , तालुका कृषि अधिकारी नंदकुमार पाचकुडवे आदींनी निकृष्ट व बोगस कांदा बियाणे लागवड शेतीस भेट देऊन पाहणी करुन अहवाल तयार करुन वरिष्ठांकडे पाठविणार असल्याचे सांगितले. 

एकरी सात लाखांची भरपाई मिळावी 
संबधित कृषि केंद्र चालक, बियाणे कंपनी व प्रतिनिधी विरोधात कठोर कारवाई करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पिडित शेतकऱ्यांनी उत्तर सोलापूर तालुका कृषि विभागाकडे केली आहे. सध्या कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत.सोलापूर बाजार समितीत कांद्याला 7 हजार प्रति क्विंटल इतका भाव मिळत आहे.तर दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत.यामुळे चालू बाजारभावाप्रमाणे एकरी किमान 7 लाख रु.प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. 

अवहाल वरिष्ठांकडे पाठविणार

शेतकऱ्यांच्या माहीतीनुसार हा खरीप हंगामात तीन - साडेतीन महिन्यापूर्वी कांदा लागवड केली आहे . कालावधीच्या मानाने कांदा पिकाची वाढ कमी प्रमाणात असून प्राथमिक दर्शनी नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. याबाबत कांदा बियाणांची व लागवड झालेल्या कांद्याची तपासणी करुन अहवाल तयार करुन वरिष्ठांकडे पाठविणार आहे.
- टी. एस. भोंडवे, पीकशास्रज्ञ कोरडवाहू संशोधन केंद्र सोलापूर 

ग्राहक मंचकडे तक्रार दाखल करणार

सध्या बाजारात कांद्याला 7 ते 8 हजार क्विंटल भाव असून चारपैसे पदरात पडतील असे वाटत असतानाच कंपनीचे बोगस बियाणे निघाल्याने आमचे एकरी किमान 7 लाखाचे नुकसान झाले आहे.कृषि विभागाचा अहवाल , बियाणे पावती आवश्‍यक कागदपत्रांसह लवकरच जिल्हा ग्राहक मंचाकडे फसवणूक झालेल्या 175 शेतकरी तक्रार दाखल करणार आहोत.
- राजेंद्र दयानंद ढवण कांदा उत्पादक शेतकरी , वडाळा ता. उत्तर सोलापूर 

कृषीविभागाकडून तपासणी सुरू

खरीप हंगामासाठी वडाळा परिसरातील अमेरिकन इंडो मार्शल सीड कंपनीचे 630 किलो बियाणे विक्री केले आहे. यामध्ये सध्या 175 शेतकऱ्यांनी बियाणे बोगस असल्याची तक्रार आहे.याबाबत संबधित कंपनीच्या अधिकारी व प्रतिनिधीस याची माहीती कळविली आहे. तसेच कृषि विभागाकडून ही याबाबत तपासणी सुरु आहे. 
- उमेश नकाते , गुरुमाऊली कृषि सेवा केंद्र , वडाळा 

महाराष्ट्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deceptive onion makers cry out loud