मराठा आंदोलकांच्या जामिनावर आज निर्णय 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सातारा - मराठा आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चावेळी झालेल्या दगडफेकीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आंदोलकांच्या जामीन अर्जावर उद्या (शुक्रवारी) निर्णय होणार आहे. 

सातारा - मराठा आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चावेळी झालेल्या दगडफेकीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आंदोलकांच्या जामीन अर्जावर उद्या (शुक्रवारी) निर्णय होणार आहे. 

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते. या वेळी काही आंदोलकांनी बॉम्बे रेस्टॉरंट चौकात रस्ता अडवला. त्यांना हुसकावण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर दगडफेकीला सुरवात झाली. या वेळी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह 34 पोलिस जखमी झाले, तसेच अनेक वाहनांच्या काचाही फोडण्यात आल्या. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे अडीच हजार जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील 63 जणांना अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या वतीने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यावर आज युक्तिवाद झाला. सरकारचे म्हणणे ऐकण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश अमेटा यांनी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण सारंगकर यांनाही बोलावले होते. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी उद्याची तारीख दिली आहे. त्यामुळे जामिनावर उद्या निर्णय अपेक्षित आहे. 

Web Title: Decision on the bail application of Maratha protesters