#DecodingElections आशा बळावल्या!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

सातारा - आगामी लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने आघाडी घेतल्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. ही बदलाची सुरवात असून, २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हाच ट्रेंड राहील, असा विश्‍वास काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत. दरम्यान, या राज्यातील निकालांचा केंद्राच्या निकालांवर परिणाम होणार नसल्याचा दावा भाजपचे पदाधिकारी करत आहेत. 

सातारा - आगामी लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने आघाडी घेतल्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. ही बदलाची सुरवात असून, २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हाच ट्रेंड राहील, असा विश्‍वास काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत. दरम्यान, या राज्यातील निकालांचा केंद्राच्या निकालांवर परिणाम होणार नसल्याचा दावा भाजपचे पदाधिकारी करत आहेत. 

काँग्रेसमुक्त भारतची घोषणा करून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने गेल्या चार वर्षांत जवळपास सर्वच निवडणुकांमध्ये काँग्रेसला धोबीपछाड दिले होते. आता सरकारचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांतच लागू होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने केलेल्या कामाचे मोजमाप जनता करू लागली आहे. त्यामुळे मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांकडे लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिले जात होते. त्यामुळे भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्हींनी या निवडणुकांमध्ये सर्वस्व पणाला लावले होते. परिणामी, संपूर्ण देशातील लोकांचे या निवडणुकांकडे लक्ष लागले होते. या निकालांमधून देशाच्या जनतेचा सूर पाहण्याची प्रत्येकाचीच उत्सुकता होती. सातारा जिल्हा हा कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता तो राष्ट्रवादीचा आहे. मात्र, विचारधारा व आघाडीच्या माध्यमातून दोन्ही पक्ष आजवर सत्तेत राहिले. त्यामुळे भाजपच्या पराभवाचा ट्रेंड राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठीही आश्‍वासक ठरणार होता. मोदीप्रेमींचेही निकालावर लक्ष होते. त्यामुळे आज सकाळपासूनच नागरिक दूरदर्शन संचासमोर बसून निकाल पाहत होते.

राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या विधानसभांच्या निवडणुकांचे औत्सुक्‍य जास्त होते. निकालांमध्ये या राज्यात काँग्रेसचे पारडे सकाळपासूनच जड दिसत होते. दुपारनंतर राजस्थान व छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता येणार, हे स्पष्ट झाले होते, तर मध्य प्रदेशमध्ये कधी काँग्रेस तर, कधी भाजप पुढे-मागे होत होते. मात्र, या राज्यातही काँग्रसेने भाजपला झुंजवल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे सकाळपासूनच काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या पक्षांना मानणाऱ्या सामान्य नागरिकांमध्येही आज बऱ्याच वर्षांपासून उत्साह दिसत होता. कऱ्हाडमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या या बदलत्या ट्रेंडचे फटाक्‍यांची आतषबाजी करत स्वागत केले.

निकालांचा ट्रेंड पाहून ठिकठिकाणी याबाबतच्या चर्चा झडत होत्या.
सत्ता स्थापनेपासून भाजपने जिल्ह्यात हातपाय पसरायला सुरवात केली होती. केंद्र व राज्यातील सत्तेच्या जोरावर जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांना ताकद देत काही ठिकाणी अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला.  मात्र, राज्य व देशातील विविध ठिकाणच्या निवडणुकांमधील निकालांमुळे राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होत होते. हा निकाल दोन्ही काँग्रसेच्या कार्यकर्त्यांचे व मतदारांचे मनोबल वाढवणारा ठरणार आहे.

गांधींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब
राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्याला आज एक वर्षे पूर्ण होत आहे. हाच दिवस त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारा, तर मोदींच्या नेतृत्वावर शंका निर्माण करणारा ठरला आहे. काँग्रेसचा विजयी रथ आता कोणीही रोखू शकत नाही. 
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

सत्तेची मस्ती उतरविली
देशात २० वर्षे सत्तेवरून हालणार नाही, असे सांगून भाजपने खोटी आश्‍वासने दिली; पण शाहू, फुले, आंबेडकरी जनतेने त्यांची सत्तेची मस्ती उतरविली. पैसा आणि सत्ता याचा वापर करून निवडणुका जिंकू शकतो हा भाजपचा विश्‍वास, फोल ठरविला आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही बदल दिसेल. 
- शशिकांत शिंदे, आमदार, विधानसभेतील राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद

ईव्हीएममध्ये घोटाळा!
ईव्हीएममध्ये घोटाळा करून काँग्रेसला हा विजय मिळाला आहे. संबंधित राज्यात असलेल्या सत्तेच्या विरोधातील मतांचाही यात वाटा आहे. या सर्व गोष्टींचा व धोरणांचा विचार करून पक्ष पुढील काळात योग्य पद्धतीने पावले टाकेल. लोकांच्या मनात अजूनही भाजप आहे. त्यामुळे आगामी लोकसभेत नरेंद्र मोदी, तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांचेच सरकार येईल. 
- डॉ. दिलीप येळगावकर, माजी आमदार, भाजप

भाजपच्या शक्तिस्थानात कौल
पाच राज्यांच्या निकालात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. आगामी काळात संपूर्ण देशाचा मूड असाच राहील. भाजपचे मूळ शक्तिस्थान असलेल्या ठिकाणीच काँग्रेसच्या बाजूने जनतेने कौल दिला आहे. इतर ठिकाणी भाजपचे अस्तित्व मजबूत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपला टाटा बाय बाय करण्याची वेळ आली आहे. 
- जयकुमार गोरे, आमदार 

देशात बदलाचे वारे 
शेतकरी व सामान्य जनतेच्या विरोधात घेतलेल्या निर्णयांचा फटका भाजप सरकारला बसला आहे. देशात बदलाचे वारे सुरू आहे. निकालावर त्याचा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या विरोधात निर्णय घेतल्याने सत्ता गेली. सर्व विरोधी पक्षही एकत्रित येत आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून निकालाकडे पाहावे लागेल. 
- बाळासाहेब पाटील, आमदार

आम्ही विजयी होऊच
भाजप सरकारने सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊनच काम केले आहे. यापुढेही तसेच काम केले जाईल. सध्या हाती आलेल्या निकालवरून थेट निष्कर्ष निघू शकत नाही. लोकांनी दिलेला कौल मान्य असतोच. यापुढेही सामान्य जनतेशी बांधिलकी ठेवून काम केल्यास आम्ही निश्‍चितच विजयी होऊ.
- विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष, भाजप

‘ॲन्टीइनकम्बन्सी’चा फटका
आजच्या निकालांचा महाराष्ट्रात काहीही परिणाम होणार नाही. प्रत्येक राज्याचा प्रश्न व तेथील अडचणी वेगवेगळ्या असतात. मुळातच त्या भागातील ‘ॲन्टीइनकम्बन्सी’चा भाजपला फटका निश्‍चित बसला. मात्र, त्यातूनही भाजपचा दारुण पराभव झाला वगैरे असे काही दिसत नाही. 
- शेखर चरेगावकर, अध्यक्ष, सहकार परिषद 

मोदी हटावची भूमिका 
गेल्या चार वर्षांत नोटाबंदी, जीएसटी लागू केल्याने सर्वसामान्य लोकांचे जगणे महाग झाले. एकाधिकारशाहीचा ऱ्हास करायचा निर्णय आता लोकांनी घेतला आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरनी काल राजीनामा दिला. देश आर्थिक खाईत लोटला जात असल्याचे लोकांनी ओळखले आहे. त्यामुळे आता मोदी हटाव ही एकमेव भूमिका लोकांच्या मनात आहे.
- सुनील माने, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Decoding Elections Loksabha Election Congress Politics