टाऊन हॉलमध्ये सजला कलाविष्कार 

टाऊन हॉलमध्ये सजला कलाविष्कार 

कोल्हापूर - येथील टाऊन हॉलच्या हिरव्यागार कॅनव्हासवर आज तब्बल पंचवीसहून अधिक कलाकारांचा कलाविष्कार सजला. कलाकार आणि कलासक्त कोल्हापूरकरांच्या तीन पिढ्या यानिमित्ताने एकवटल्या. निमित्त होते, कलातपस्वी आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबूराव पेंटर आणि विश्वरंग विश्वनाथ नागेशकर स्मृतिसोहळ्यानिमित्त आयोजित "मैफल रंग-सुरांची' या उपक्रमाचे. रंगबहार संस्थेने सलग एकेचाळीसाव्या वर्षी या उपक्रमाचे आयोजन केले. 

दरम्यान, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ चित्रकार विश्रांत पोवार यांना रंगबहार जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले तर शिल्पकार किशोर पुरेकर यांचा चंद्रा श्री पुरस्काराने गौरव झाला. यावेळी ज्येष्ठ चित्रकार श्‍यामकांत जाधव, इंद्रजीत नागेशकर, विलास बकरे, सर्जेराव निगवेकर, रियाज शेख, प्राचार्य अजय दळवी, धनंजय जाधव, विजय टिपुगडे, सागर बगाडे, राहूल रेपे, संजीव संकपाळ आदी यावेळी प्रमुख उपस्थित होते. 

डॉ. पवार म्हणाले, ""रंगबहार संस्थेच्या रंग-सुरांच्या मैफलीत एखादा नवोदित कलाकार कलाविष्कार सादर करतो आणि तो नंतर या क्षेत्रातच नावलौकिक मिळवतो. कोल्हापूरची कलापरंपरा अधिक नेटाने पुढे नेण्यासाठी हा उपक्रम निश्‍चितच महत्वाचा ठरतो आहे. राजर्षी शाहू महाराजांनी कलेला प्रोत्साहन दिले. पण, आता बदलत्या काळातही येथील कला परंपरा अधिक समृध्द होत असून कलाकार मंडळी स्वतःबरोबरच कोल्हापूरचे नावही सातासमुद्रापार नेत आहेत. 

ग्वाल्हेर घराण्याच्या युवा गायिका स्वानंदी निस्सीम (मुंबई) यांच्या शास्त्रीय गायनाने मैफलीला प्रारंभ झाला. त्यांना प्रशांत देसाई यांची तबला तर सारंग कुलकर्णी हार्मोनियम साथ होती. गायनाच्या या संमोहित माहौलातच मग चित्रकार अशोक धर्माधिकारी, पुष्पक पांढरबळे, महेश सुतार (गडहिंग्लज), रमन लोहार (गडहिंग्लज), प्रा. विश्वास पाटील (इचलकरंजी) यांच्या व्यक्तिचित्रांना आकार येवू लागला. 

विवेक कावळे यांनी सेल्फ पोर्टेट साकारले तर अमित मुसळे यांनी अचूक रेखांकनातून अर्कचित्र साकारले. एस. निंबाळकर, मनोज दरेकर, अक्षय पाटील, अशोक बी. साळुंखे (पुणे) यांनी निसर्गचित्रे साकारली. चेतन चौगले, सरिता फडके (गडहिंग्लज), आनंदा सावंत (कोल्हापूर), विजय उपाध्ये (कोल्हापूर), राखी अराडकर (सिंधुदुर्ग), विनायक पोतदार (पुणे) यांनीही विविध कलाकृती साकारल्या. 

युवा शिल्पकार आशिष कुंभार, प्रशांत दिवटे, प्रफुल्ल कुंभार, योगेश माजगावकर, प्रफुल्ल कुंभार यांनी व्यक्तीशिल्पे तर रंगावलीकर प्रसाद राऊत यांनी रंगावलीतून संस्थेचा बहुरंगी लोगो साकारला. सुमारे चार तासांच्या या मैफलीत हजारो कलासक्त कोल्हापूरकरांची मांदियाळी अवतरली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com