शिष्यवृत्ती घोटाळेबाज दीपक घाटे निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

घाटेंचा गैरव्यवहार आणि आदेश नसताना सांगलीत कार्यभार स्वीकारल्याबद्दल तक्रार केली होती. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेप्रकरणी देखील तक्रार केली आहे. त्यावर अद्याप निर्णय घेतला नाही. घाटे यांची व मालमत्तेची सखोल चौकशी करण्यात यावी. 
- ऍड. दत्तात्रय जाधव, सांगली 

सांगली : सोलापूर येथील 5 कोटी रुपयांच्या शिष्यवृत्ती अपहारप्रकरणातील संशयित आरोपी आणि सांगलीतील समाजकल्याणचे तत्कालीन सहायक आयुक्त दीपक भास्करराव घाटे यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने काल निलंबित केले.

घाटे सध्या मुंबई उपनगर येथे जात प्रमाणपत्र समितीमध्ये संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत होते. घाटे यांचा शिष्यवृत्ती अपहारप्रकरण, सांगलीतील वादग्रस्त कारकीर्द आणि कोट्यवधीच्या मालमत्तेप्रकरणी सांगलीतील माहिती अधिकार शिक्षण समितीने कारवाईसाठी पाठपुरावा केला होता. 

सोलापूर जिल्ह्यात 2012 ते 2014 मध्ये घाटे समाजकल्याणचे सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. या काळात शिष्यवृत्तीमध्ये पाच कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी घाटे आणि इतरांविरुद्ध सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तेथील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपास केला. नोव्हेंबर 2015 मध्ये घाटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेला.

सोलापूर पोलिसांनी ते फरारी असल्याचा अहवाल न्यायालयात दिला होता. तिकडे फरारी असलेले घाटेना कोणताही आदेश नसताना सांगलीचा पदभार मनमानीपणे स्वीकारल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर संविधान दिनात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

भ्रष्ट अधिकाऱ्याने पुन्हा कार्यभार स्वीकारल्याबद्दल माहिती अधिकार शिक्षण समितीचे ऍड. दत्तात्रय जाधव, शाहीन शेख यांनी समाजकल्याण आयुक्तांकडे तक्रार केली. 
घाटेंच्या घोटाळ्याबाबत मार्च 2016 मध्ये विधान परिषदेत तारांकित प्रश्‍न सदस्य संदीप बाजोरिया, हेमंत टकले, नरेंद्र पाटील, किरण पावसकर, अनिल भोसले यांनी उपस्थित केला होता. या प्रश्‍नाच्या चर्चेवेळी घाटेंच्या मालमत्तेबाबत समितीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीबाबत सामाजिक न्यायमंत्री यांच्याकडे खुलासा मागवला गेला होता.

घाटेंच्या घोटाळ्याबाबत आणि मालमत्तेबाबत सांगलीतील समितीने तक्रार करूनही वर्षभर कारवाई झाली नव्हती. परंतु उशिरा का होईना शिष्यवृत्ती गैरव्यवहारप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित असल्यामुळे तसेच गुन्हा तपासावर असल्यामुळे नागरी सेवा नियमानुसार घाटे यांना निलंबित केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शुक्रवारी निलंबनाचा आदेश जारी केला. त्यांनी मुंबईतील मुख्यालय पूर्वपरवानगीशिवाय सोडू नये, असेही आदेशात म्हटले आहे. 

घाटेंची मालमत्ता
शिरढोण (कवठेमहांकाळ) येथे कोटीचा बंगला, ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या नावावर दीड एकर जमीन, मिरजेत दीड कोटीचा बंगला, विश्रामबागला कोटीचा फ्लॅट, कोल्हापुरात खासबाग मैदानाजवळ दोन कोटींचा बंगला, राधानगरी धरणाजवळ तीस एकर जमीन, पुणे येथे कोटीचा बंगला, कर्नाटकात पत्नीच्या नावे दहा एकर जमीन, चारचाकी वाहने या मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार वर्षापूर्वीच केली आहे.

Web Title: Deepak Ghate rusticated in Sangli