हजारांतला एखादा ’लै भारी’; फोटोग्राफी छायाचित्रकाराच्या नजरेतून

संभाजी गंडमाळे
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

फोटोग्राफी हे एक विलक्षण खर्चिक आणि वेळखाऊ व्यसन आहे ! आणि नुसताच पैसा आणि वेळ खर्च होत नाही तर अफाट बौद्धीक आणि शारिरिक कष्टही करावे लागतात या व्यसनापायी !

चित्रकार, शिल्पकार, हस्तकलाकार असो किंवा छायाचित्रकार आपापल्या परीने तो कलाकृती साकारत असतो. कॅमेऱ्यात बंदिस्त करीत असतो. मात्र, ती साकारताना त्याची म्हणून एक वेगळी दृष्टी असते. एक वेगळा विचार किंवा काही तरी वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न असतो. मात्र, तो सामान्य रसिकांपर्यंत पोचतोच असे नाही किंवा रसिक त्याचा आपापल्या परीने अर्थ लावत असतात. या पार्श्‍वभूमीवर कलाकारांच्या दृष्टीतून त्यांच्याच कलाकृतीविषयी त्यांच्याच शब्दांतून...

मुळात फोटोग्राफी ही एक कला आहे. तांत्रिक कला !! तांत्रिक या दृष्टीनं असं की या कलेमध्ये यंत्राचा वापर केला जातो आणि त्यामुळे सुरुवातीला या कलाविश्‍वामध्ये फोटोग्राफीला कला म्हणून स्थान मिळालं नाही. फोटोग्राफी हे एक विलक्षण खर्चिक आणि वेळखाऊ व्यसन आहे ! आणि नुसताच पैसा आणि वेळ खर्च होत नाही तर अफाट बौद्धीक आणि शारिरिक कष्टही करावे लागतात या व्यसनापायी ! या व्यसनासाठी नुसता भारीचा कॅमेराच पुरत नाही तर ट्रायपॉड, लेन्सेस, फिल्टर्स, बॅटऱ्या, बॅगा, सॉफ्टवेअर्स अशा अनंत गोष्टी आवश्‍यक वाटायला लागतात आणि फोटोग्राफीचं व्यसन लागलेली माणसं त्या सगळ्या गोष्टी जमवायलाही लागतात. पण ही सगळी साधनं जमवल्यामुळे आणि जवळ असल्याने फोटो चांगले येतातच असं नाही !  ती कशी वापरायची याचं तंत्र आणि मंत्रही आत्मसात करायला हवं आणि ते करण्यासाठी अफाट कष्ट आणि साधना करावी लागते. 

एके दिवशी गळ्यात कॅमेरा अडकवला आणि भटकंती सुरू झाली. एका गावात मग फोटोतील या दोन माऊलींनी लक्ष वेधलं. खर तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत महिला कामात गुंतून गेलेल्या असतात. चार शब्द बोलायचं म्हंटलं तरी बऱ्याचदा वेळ मिळत नाही. मोबाईल नावाचं प्रकरण या पिढीनं अजून  तरी जवळ केलेलं नाही. अशावेळी मग रस्त्यातच कुठे तरी त्यांची भेट होते आणि मग उभ्या उभ्याच गप्पांचा फड रंगतो. त्यांच्या संवादातील या साऱ्या भावना मग मी कॅमेऱ्यात अशा बंदिस्त केल्या. 

एखादाच ’लै भारी’

चांगली साधनं आणि कष्ट सगळं केल्यावरही चार-पाचशे फोटोंमधला एखादा फोटो बरा येतो, दोन-चार हजारांतला एखादा चांगला तर दहा-वीस हजारांतला एखादा ’लै भारी’ ठरतो. मात्र, हे समाधान वेगळेच असते.
- दीपक कुंभार, छायाचित्रकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepak Kumbhar Photography Opinion Only One From Thousand