शिवेंद्रसिंहराजेंसमोर दीपक पवारांचे आव्हान ?

महेश बारटक्के
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

  बदलत्या राजकीय स्थितीत सातारा- जावळीच्या विधानसभेसाठी वाढणार रंगत

कुडाळ ः सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमदेवार म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले रिंगणात असून, त्यांना दीपक पवार आव्हान देणार का? हे लवकरच स्पष्ट होईल. शिवेंद्रसिंहराजेंसारख्या तगड्या उमेदवाराचे आव्हान मोडून काढण्याची ताकद असलेल्या उमेदवाराचा राष्ट्रवादीतर्फे शोध सुरू आहे. भाजपमध्ये नाराज असलेल्या पवार यांनी कोणत्याही स्थितीत विधानसभेची निवडणूक लढविण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून रिंगणात उतरतील, अशी शक्‍यता बदलत्या राजकीय स्थितीत झाली आहे. त्यांच्या उमेदवारीचे संकेतही कार्यकर्त्यांकडून मिळत आहेत. 

शिवेंद्रसिंहराजे यांना टक्कर देणारा सक्षम उमेदवार म्हणून पवार यांच्या नावाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. राजकारणात महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या पवार यांची आजपर्यंत लढवय्या म्हणून ओळख आहे. शिवेंद्रसिंहराजेही गेल्या दहा वर्षांपासून जावळीचे नेतृत्व करीत असून, तालुक्‍यातील सत्तास्थाने त्यांनी आपल्याकडे ठेवली आहेत. सलग दोन वेळा या मतदारसंघातून भोसले निवडून आले आहेत, तर दुसरीकडे जावळीमध्ये सत्तास्थाने राष्ट्रवादीकडे असताना प्रवाहाविरोधात पवार सलग दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून कुडाळ गटातून निवडून आले आहेत. बालेकिल्ल्यात कॉंग्रेस- राष्ट्रवादीला यश मिळवून अस्तित्व दाखवण्याचे आव्हान सध्या आहे. श्री. भोसले यांच्या भाजप प्रवेशामुळे जावळीत सध्या राष्ट्रवादीकडे मोठे नेतृत्व नाही. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यास श्री. पवार यांच्या नेतृत्वास अधिक वाव मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीचा पर्याय निवडण्याची अधिक शक्‍यता आहे. याबाबत निर्णयासाठी त्यांनी काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजनही केले होते.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा येत्या रविवारी सातारा दौरा असून, त्या वेळी नव्या घरोब्याची घोषणा करण्याची दाट शक्‍यता आहे. त्यांनी कोणताही पर्याय निवडला, तरी भाजपला धक्का बसणार हे निश्‍चित आहे. दीपक पवार यांचा भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय पक्का झाल्याचे वृत्त आहे. मात्र, भाजप सोडल्यानंतर कोणत्या पक्षात जायचे? राष्ट्रवादी की अन्य? असा पेच त्यांच्यापुढे आहे. प्रमुख कार्यकर्त्यांची मात्र, राष्ट्रवादीमध्ये जाण्याचाच आग्रह आहे. आमदार भोसले यांची बाजू सध्या तरी वरचढ आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कडवी लढत होणार, की एकतर्फी होणार असे चित्र होते. मात्र, दीपक पवारांच्या पक्षांतरानंतर हे चित्र पालटले जाईल, अशी चर्चा आहे. आजपर्यंत पवार यांनी केलेली विधानसभेची तयारी आणि अचूक चालींचे प्रदर्शन घडवत लढतीचा नूर त्यांनी पालटवून टाकला आहे, हे मात्र निश्‍चित आहे. पवारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर या लढतीचे चित्र वेगळंही दिसू शकेल, असा अंदाज कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. शिवेंद्रराजेंसारख्या विरोधकाबरोबर दोन हात करण्यासाठी पवारांना मेहनत घ्यावी लागणार आहे. आजपर्यंत दीपक पवारांनी जावळी तालुक्‍यात भाजप वाढवली. मात्र, भाजपची वाढवलेली मते नक्की कुणाकडे वळतात हे पाहणेही औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

जावळीत जनसंपर्क कायम 

दीपक पवारांनी 2012 ला जावळी विकास आघाडीमधून निवडणूक लढवली. त्या वेळी 1900 मतांनी विजयी होऊन ते पहिल्यांदा जिल्हा परिषदेवर गेले. त्यानंतर अपक्ष असतानाही जिल्ह्यात एक नंबरच्या मताधिक्‍यांनी जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर भाजपच्या वतीने 2014 च्या विधानसभेसाठी उमेदवारी मिळवून शिवेंद्रराजेंच्या विरोधात 54 हजार मते मिळवली. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवसांपासून खचून न जाता पुन्हा पक्ष बांधणीला सुरवात केली. 
पक्षाचे कार्यक्रम मतदारापर्यंत पोचवण्याचे काम केले. पक्ष बांधणीमध्ये 
सातारा विधानसभेमध्ये 432 बूथ प्रमुखांची बांधणी करत सातारा नगरपालिका, जावळी 
पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थेत कमळाच्या चिन्हावर निवडणुका लढवून मेढा नगरपंचायतीमध्ये तीन नगरसेवक व स्वतः जिल्हा परिषद सदस्य म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासाठीही काम करून नरेंद्र पाटील यांना जावळी तालुक्‍यामधून 2771 मताधिक्‍य मिळवून देण्यात दीपक पवारांचा मोलाचा वाटा होता. 

भोसलेंची जावळीवरील पकड मजबूत 

मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी 2009 ला सातारा जावळीतून विधानसभेची निवडणूक लढवून राज्यात दोन नंबरच्या मताधिक्‍याने म्हणजे एक लाख पाच हजार एवढ्या मताधिक्‍याने विजय संपादन केला होता. त्यानंतर 2014 च्या विधानसभेवेळी त्यांनी दीपक पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्यांनी 48 हजार एवढ्या मताधिक्‍याने विजयी होऊन पवारांचा पराभव केला होता. दहा वर्षांच्या कालवधीत त्यांनी जावळीतील पंचायत समितीसह कुडाळ जिल्हा परिषद गट वगळून उर्वरित दोन्ही जिल्हा परिषद गट, तसेच तालुक्‍यातील बाजार समिती व इतर संस्थांवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता मिळवली होती. एकूणच आमदार भोसले यांची जावळी तालुक्‍यावरील राजकीय पकड मोठी असून, सर्व सत्तास्थाने त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे त्यांना टक्कर देणे तितकेसे सोपे नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepak Pawar's challenge before Shivinderasinghraje