Video : पंचगंगातीरी नयनरम्य प्रकाशोत्सव..! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

प्रज्वलित झालेल्या पणत्यांतून "करूया आदर निसर्गाचा' असाही संदेश दिला गेला. हा सारा विलोभनीय आविष्कार अनुभवण्यासाठी हजारो कोल्हापूरकरांनी सहकुटुंब हजेरी लावली. विविध सामाजिक प्रश्‍नांवर भाष्य करणाऱ्या रांगोळ्या, नयनरम्य आतषबाजी तर होतीच, त्याशिवाय भाव-भक्तीगीतांच्या सुरेल आविष्काराने दीपोत्सवाची पहाट आणखी सूरमयी केली. 

कोल्हापूर - पहाटे तीनपासूनच कोल्हापूरकरांची पावलं पंचगंगा घाटाकडे वळू लागली. कुडकुडवणाऱ्या थंडीत एकेक दीप प्रज्वलित होऊ लागला आणि चारनंतर साऱ्या घाटावर विविधरंगी प्रकाशरेषा अवतरू लागल्या. त्याच्या जोडीला शिवाजी पुलावरून पडणारा सप्तरंगी लेसरचा झोतही सारा माहौल प्रकाशमान करत होता. एकेक दीप प्रज्वलित झाला आणि सारा घाट परिसर हजारो पणत्यांच्या या झगमगाटात अक्षरशः न्हाऊन निघाला. निमित्त होते, येथील शिवमुद्रा प्रतिष्ठान, संदीप देसाई सोशल फाउंडेशनतर्फे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित दीपोत्सवाचे. 

दरम्यान, प्रज्वलित झालेल्या पणत्यांतून "करूया आदर निसर्गाचा' असाही संदेश दिला गेला. हा सारा विलोभनीय आविष्कार अनुभवण्यासाठी हजारो कोल्हापूरकरांनी सहकुटुंब हजेरी लावली. विविध सामाजिक प्रश्‍नांवर भाष्य करणाऱ्या रांगोळ्या, नयनरम्य आतषबाजी तर होतीच, त्याशिवाय भाव-भक्तीगीतांच्या सुरेल आविष्काराने दीपोत्सवाची पहाट आणखी सूरमयी केली. 
दीपोत्सवाची वेळ पहाटे चारची; पण काल रात्रीपासूनच त्याच्या तयारीला प्रारंभ झाला. रंगावलीचा आविष्कार ठिकठिकाणी सजू लागला. कुणी संस्कारभारती, कुणी ठिपक्‍यांची, कुणी फुलांची, तर कुणी विशिष्ट थीमनुसार रंगावली साकारत होता आणि जणू साऱ्या कलाकारांचा हा मुक्त आविष्कार साऱ्यांनाच भुरळ घालत होती. पहाटे चारच्या सुमारास पंचगंगेची विधिवत पूजा झाली. "हर हर महादेव'च्या गजरात स्नानाचा सोहळाही सजला आणि दीपोत्सवाला प्रारंभ झाला. घाटावरील समाधी मंदिरेही विद्युत रोषणाईने झळाळून निघाली. 

फोटो फिचर :  पंचगंगा घाटावर दीपोत्सव... नयनरम्य सोहळा 

पहाटे चार ते पाच या वेळेत पंचगंगा नदी परिसर नागरिकांनी फुलून गेला. उगवतीच्या सूर्याच्या साक्षीने सकाळी सातपर्यंत कोल्हापूरकरांचे हे सहकुटुंब सेलिब्रेशन सुरू राहिले. "अंतरंग'प्रस्तुत महेश हिरेमठ यांच्या मैफलीबरोबरच यंदा कराओके मैफलीचा आनंदही अनेक कोल्हापूरकरांनी घेतला. विविध संस्था, संघटनांतर्फे यावेळी दुधाचे वाटप झाले. नगरसेवक संभाजी जाधव, पृथ्वीराज महाडिक, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, नेपोलियन सोनुले आदींच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा सजला. शिवमुद्रा प्रतिष्ठानचे दीपक देसाई, अक्षय मोरे, अवधूत कोळी, प्रवीण चौगले, अविनाश साळोखे, मयूर गवळी, अनिल शिंदे, ऋतुराज सरनोबत आदींनी संयोजन केले. 

फुटबॉल अन्‌ बेरोजगारी... 
कोल्हापूरचा फुटबॉल वाचवायचा असेल तर शाहू स्टेडियम वाचवा, मोबाइल व ड्रायव्हिंग एकाच वेळी नको, वाढती बेरोजगारी आणि तरुणाईचे प्रश्‍न, छत्रपती शंभूराजेंची शिवपूजा, दिल का दरिया अशा विविध विषयांवर रांगोळ्या सजल्या. श्री अंबाबाई, गणरायाच्या विविध प्रतिकृती आणि फुलांची आरासही लक्षवेधी ठरली. 

कोल्हापुरी ब्रॅंड अन्‌ कचरा व्यवस्थापनही 
कोल्हापूर महापालिकेने आता कचरा संकलन करताना ओला व सुका कचरा वेगळा संकलन करण्यास प्रारंभ केला आहे. सजग कोल्हापूरकर म्हणून आम्ही हा नियम पाळायलाच हवा, असा संदेश देणारी रांगोळी साऱ्यांनाच भावली. कोल्हापूरची संस्कृती उलगडताना कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी मिसळ, कोल्हापुरी गूळ आदी कोल्हापुरी ब्रॅंडची बदलत्या काळातही जपणूक करायलाच हवी, असा संदेशही एका भव्य रांगोळीतून देण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepoushav On The Bank Of Panchaganga River Video