देगाव सांडपाणी प्रक्रिया केंद्रात मिथेनपासून वीजनिर्मिती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

सध्या रोज 50 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. या ठिकाणी 'टर्सरी' प्लॅन्ट मधून एनटीपीसीला प्रक्रिया केलेले 75 एमएलडी पाणी दिले जाणार आहे. त्या मोबदल्यात एनटीपीसीकडून रोख रक्कम घेतली जाणार आहे.

सोलापूर : महापालिकेच्या देगाव येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात मिथेन वायूपासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्यात आला  आहे. येत्या दोन दिवसांत प्रत्यक्षात वीज निर्मितीस सुरवात होईल. मिथेन वायू किती प्रमाणात उपलब्ध होईल, त्यावर वीज निर्मितीचे प्रमाण अवलंबून आहे.

महाराष्ट्र राज्य सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत सुमारे 75 कोटी रुपयांचा सांडपाणी प्रकल्प उभारण्यात आला आहे. देगाव येथील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे. सध्या रोज 50 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. या ठिकाणी 'टर्सरी' प्लॅन्ट मधून एनटीपीसीला प्रक्रिया केलेले 75 एमएलडी पाणी दिले जाणार आहे. त्या मोबदल्यात एनटीपीसीकडून रोख रक्कम घेतली जाणार आहे.

प्रत्यक्ष वीज निर्मिती सुरु झाल्यावर या प्रकल्पाला लागणाऱ्या विजेमध्ये 40 टक्के बचत होणार आहे. पर्यायाने महापालिकेच्या विज बिलातही बचत होईल. देगाव येथे उभारण्यात आलेले केंद्र हे 75 एमएलडी क्षमतेचे आहे. तर कुमठा आणि अक्कलकोट एमआयडीसी येथे अनुक्रमे 15 एमएलडी आणि 12 एमएलडी क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्याचेही काम प्रगतिपथावर आहे. ही तिन्ही केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर रोज 102 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करणे शक्‍य होणार आहे.
 

Web Title: degaon drainage processing plant to produce methane gas