दाजीपुरातील हॉलिडे रिसॉर्ट योजना का रखडली ?

Delay In Dajipur Holiday Resort Scheme Work
Delay In Dajipur Holiday Resort Scheme Work

राधानगरी ( कोल्हापूर ) - हॉलिडे रिसॉर्टची योजना अंतिम टप्प्यात रखडत ठेवून पर्यटन विकास महामंडळाने दाजीपूरच्या पर्यटन विकासाची परवडच सुरू ठेवली आहे. दाजीपुरात येणाऱ्या पर्यटकांना खात्रीची व सुरक्षित निवास व भोजन व्यवस्थेच्या सुविधेसाठी उभारण्यात येत असलेल्या या रिसॉर्टचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. केवळ अंतर्गत कामे बाकी असल्याने हे पर्यटकांसाठी खुले होण्यात अडसर आहे. 

तब्बल एक दशकापासून या हॉलिडे रिसॉर्ट योजनेचा विषय गाजत आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत पाच वर्षांपूर्वी रिसॉर्ट उभारणीला प्रारंभ झाला, पण पर्यटकांना पायाभूत सुविधांची वानवा जाणवत आहे. रिसॉर्ट योजनेबाबत तक्रारी वाढल्यानंतर आमदार प्रकाश आबिटकर यांनी तत्कालीन पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल यांची भेट घेऊन वस्तूस्थिती निदर्शनास आणून दिली. मंत्र्यांनी रिसॉर्ट पर्यटकांसाठी लवकरात लवकर खुले होईल, यादृष्टीने नियोजन आखून शिल्लक कामे युद्धपातळीवरून करण्याचे निर्देश फेब्रुवारी 2019 मध्ये दिले होते.

राज्यमार्गापासून तीनशे मीटरवर रिसॉर्ट

पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक कोल्हापूर जिल्ह्यातीलच आहेत. त्यांच्या कारकिर्दीतच उभारलेल्या रिसॉर्ट बेवारस ठरल्यासारखी स्थिती आहे. दाजीपूरच्या पायथ्याशी राधानगरी जलाशयाच्या पश्‍चिमेला कोल्हापूर कोकणासह गोवा व कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या राज्यमार्गापासून तीनशे मीटरवर हे रिसॉर्ट आकाराला येत आहे. रिसॉर्ट उभारणी कामाच्या मूळ मुदतीबरोबरच वाढीव मुदत संपली तरी ते अर्धवट आहे. 

ही कामे रखडली 

दीड वर्षापूर्वीच रिसॉर्टची 14 निवासी कक्ष असलेली मुख्य इमारत व उपहारगृहाची स्वतंत्र इमारत पूर्ण झाली, मात्र त्यानंतर दारे, खिडक्‍या, फरशी बसविणे, वीज व पाणी व्यवस्था, रंगरंगोटी, फर्निचर आदी कामे बाकी आहेत. अंतर्गत कामे बाकी राहिल्याने कोटयवधी रुपये खर्च झालेले रिसॉर्ट विनावापर आहे. 

ठेकेदाराकडून महामंडळाचा आदेश धाब्यावर

मुदतीत काम करण्याचा आदेश ठेकेदाराकडून धाब्यावर 
महामंडळांनी कामे पूर्ण करण्यास ठेकेदाराला तीन महिन्यांचा अवधी देऊन मुदतीत कामे करण्याचा आदेश काढला. 
प्रादेशिक व्यवस्थापकांनी रिसॉर्टच्या उर्वरित कामांना आठवडाभरात प्रारंभ होईल. तीन महिन्यांत रिसॉर्ट खुले होण्यासाठी प्रयत्न राहतील. यापुढे रिसॉर्टची कामे रखडणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. आठ महिन्यांचा कालावधी होऊनही ठेकेदाराने कामे सुरू करण्याची तसदी घेतलेली नाही. ठेकेदाराने महामंडळाचा आदेश धाब्यावर बसविला आहे. वाढीव मुदतीत संबंधित ठेकेदाराने कामे पूर्ण न केल्यास ठेका रद्द करण्याचा इशाराही महामंडळाने दिला होता. हा इशारा कागदावरच राहिला आहे. 

काम दोन महिन्यात पूर्ण करू
यंदाच्या अतिवृष्टीमुळे आणि दीर्घकाळच्या पावसामुळे रिसॉर्टचे काम ठप्प झाले आहे. ते लवकरच सुरू होत आहे. येथील प्रतिकूल परिस्थिती आणि कामगारटंचाईमुळे रखडलेले हे काम दोन महिन्यांत पूर्ण करून घेणार 
- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com