आला रे आला...शिवसेनेचा वाघ आला; सेना स्टाईलने उमेदवारी मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

इच्छुक माईकचा ताबा घेण्यापूर्वी समर्थकांनी ‘आला रे आला वाघ आला...शिवसेनेचा वाघ आला’, ‘जय भवानी...जय शिवाजी’ अशा जोरदार घोषणा देऊन समर्थकांनी सभागृह दणाणून सोडले.

सांगली - ‘आला रे आला...शिवसेनेचा वाघ आला’, ‘जय भवानी-जय शिवाजी’ अशी जोरदार घोषणाबाजी आणि समर्थकांच्या शिट्या, टाळ्यांच्या गजरात आज खास सेना स्टाईलने इच्छुकांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली. 

येथील मार्केट यार्डातील वसंतदादा पाटील सभागृहात सेनेच्यावतीने मुलाखती पार पडल्या. जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार, नगरसेवक शेखर माने, नगरसेवक गौतम पवार, नगरसेवक शिवराज बोळाज, नगरसेविका अश्‍विनी कांबळे, बजरंग पाटील, दिगंबर जाधव, रावसाहेब घेवारे, रावसाहेब खोचगे, सुनिता मोरे आदींची उपस्थिती होती.
प्रभाग क्रमांक 12 पासून मुलाखतीस प्रारंभ झाला. काही इच्छुकांनी आजवर भगव्यासाठी रक्त सांडले, लाठयाकाठ्या खाल्ल्या असल्याचा दाखला देत उमेदवारीची मागणी केली. प्रभागातील अनेक प्रश्‍न प्रलंबित असून ते सोडवण्यासाठी उमेदवारी द्या. विद्यमान नगरसेवकांनी कोणताच विकास केला नसल्याचे सांगून काहींनी उमेदवारीवर दावा सांगितला. क्रीडा मंडळाच्या माध्यमातून उपक्रम राबवल्याचे सांगूनही अनेकांनी उमेदवारीवर हक्क सांगितला. पक्षाच्या प्रामाणिकपणाची उदाहरणे देऊनही काहींनी उमेदवारी मागितली.

उमेदवारीसाठी इच्छुकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. फटाक्याची आतषबाजी करत काहींनी आगमनाची वर्दी दिली. तसेच इच्छुक माईकचा ताबा घेण्यापूर्वी समर्थकांनी ‘आला रे आला वाघ आला...शिवसेनेचा वाघ आला’, ‘जय भवानी...जय शिवाजी’ अशा जोरदार घोषणा देऊन समर्थकांनी सभागृह दणाणून सोडले. इच्छुकाच्या भाषणावेळी अधून-मधून शिट्या आणि टाळ्यांचा पाऊस पाडत भगवे झेंडे फडकावले जात होते. उमेदवारी का द्यावी? याबाबत नगरसेवक माने, पवार आदींनी इच्छुकांना विचारणा केली. इच्छुक उमेदवार आणि समर्थकांच्या गर्दीमुळे सभागृह भरले होते. तसेच रस्त्यावरही गाड्यांची गर्दी दिसली. भगवे झेंडे, मफलर, टोप्या यामुळे परिसर भगवामय झाल्याचे चित्र दिसले.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Demand for candidature by Shivsena Style at sangli