विरोधी पक्षनेतेपद गोठवण्‍याची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

सांगली - महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी राष्ट्रवादी नागरिकांच्या डोळ्यात धूळ टाकत भ्रष्ट युती तयार केली आहे. महापालिकेच्या पैशांवर एकत्रित डल्ला मारणाचा त्यांचा डाव आम्ही हाणून पाडूच; पण विरोधी राष्ट्रवादी सत्तेत सामील झाल्याने विरोधी पक्षनेतेपद गोठवण्यात यावे, अशी मागणी जिल्हा सुधार समितीने आज पत्रकार परिषदेत केली. या भ्रष्ट युती विरोधात शॅडो महापालिका स्थापन करण्याचा निर्णयही कार्याध्यक्ष ॲड. अमित शिंदे, आर्किटेक्‍ट रवींद्र चव्हाण, प्रा. आर. बी. शिंदे यांनी जाहीर केला. 

शिंदे म्हणाले, ‘‘सत्ताधारी काँग्रेसच्या बरोबरीने विरोधी पक्षाला पदे मिळाली आहेत. त्यामुळे तांत्रिक, कायदेशीर व नैतिकदृष्ट्या राष्ट्रवादीचे विरोधी पदाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. त्यामुळे हे पदच गोठवण्यात यावे. महापौरांनी याबाबतचा निर्णय घ्यायला हवा होता. मात्र नागरिकांची दिशाभूल करून एकत्रितपणे उर्वरित काळात डल्ला मारण्याचा डाव आखला आहे. याबाबत विभागीय आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केली जाणार आहे. त्यांच्या विरोधात एकत्रितपणे आवाज उठवून तडफदार कार्यकर्त्यांची मोट बांधणीही सुरू केली आहे. या भ्रष्ट युतीला भाजपचीही मूक संमती दिसते आहे. हा डाव सुधार समिती हाणून पाडेल.’’

यावेळी कौस्तुभ पोळ, सुनील गिड्डे, आसिफ मुजावर, सुनील मोरे, तानाजी रुईकर, अंकुश तारळेकर, रोहित कुंभारकर, राहुल जाधव, नितीन मोरे, संभाजी पोळ, संतोष शिंदे, अब्दूल मुलाणी, बापू सूर्यवंशी, रवींद्र ढोबळे, राणी यादव उपस्थित होते. 

आगामी निवडणुकीत  समितीचा पर्याय?
सत्ताधारी आणि विरोधक एकत्रितपणे आल्याने त्याला पर्याय म्हणून सुधार समिती आगामी निवडणुकीत मैदानात उतरणार का? या प्रश्‍नांवर ॲड. अमित शिंदे म्हणाले,‘‘सुधार समिती महापालिकेतील भ्रष्ट कारभाराला विरोध करते आहे. निवडणुकीला अजूनही वेळ आहे. परंतु आम्ही सक्षम कार्यकर्त्यांची मोट बांधण्यास सुरवात केली आहे.’’

उपमहापौर गटाची नौटंकी..! 
ॲड. अमित शिंदे म्हणाले, ‘‘महापालिकेत सत्ताधारी गटातच दोन गट निर्माण झाले आहे. उपमहापौर गटाने नौटंकी करत नागरिकांची दिशाभूल करण्यास सुरवात केली आहे. तेही या कटात सामील आहेत. त्यांना खरेच नागरिकांच्या प्रश्‍नांची जाण असेल, तर त्यांनी नौटंकी  बंद करून काँग्रेसच्या सदस्यांच्या पदाचे राजीनामे द्यावेत. मग बाहेर उतरून विरोध करावा.’’

Web Title: Demand for frozen opposition leader