किल्ले संर्वधनासाठी केंद्राकडे शंभर कोटींची मागणी 

प्रशांत देशपांडे 
रविवार, 8 सप्टेंबर 2019

राज्यातील 10 किल्ल्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडे 100 कोटी रुपयांची मागणी केली आहे.

सोलापूर : महाराष्ट्रातील रायगड किल्ल्याचे मॉडेल पोर्ट बनविण्याचे काम आता सुरू आहे. त्या धर्तीवर राज्यातील 10 किल्ल्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडे 100 कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यानुसार अर्थ विभागातील अधिकारी एन.के.सिंग यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी रविवारी सोलापूरात सकाळशी बोलताना दिली. 

महाराष्ट्रात सद्यस्थितीत 80 किल्ले असून, त्यातील राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाकडे 40 किल्ले आहेत. तर केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागामार्फत उर्वरित 40 किल्ल्यांचे संर्वधन केले जात आहे. त्यातील रायगड या किल्ल्याचे मॉडेल पोर्ट करण्याचे काम सुरू आहे. सोलापूरातील भुईकोट किल्ल्यांसह महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग, पन्हाळगड, विर्दभातील 2 किल्ल्यांसह अन्य पाच किल्ल्यांच्या सवंर्धनासाठी व विकासासाठी केंद्र सरकारकडे शंभर कोटींची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, तो निधी मिळाल्यानंतर ऐतिहासिक वारसा जतन होऊन पर्यटकांसाठी किल्ले आकर्षण ठरतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. निधीबाबत अनेकवेळा दिल्लीत बैठकाही पार पडल्या असून लवकरच निधी मिळेल आणि कामाला सुरुवात होईल, असेही ते म्हणाले. सोलापूरातील भुईकोट किल्ल्याची दुरावस्था झाली असून, त्याच्याही विकासासाठी आपला पाठपुरावा सुरु असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand of Rs. 100 crores to the Center for the conservation of the fort