देशभरात वाढतेय विजेची मागणी, मात्र सोलापूर स्थिर! 

mahavitaran
mahavitaran

सोलापूर : विकसनशील देशाच्या यादीत भरारी मारून भारताने अलीकडेच विजेच्या मागणीचा आजपर्यंतचा विक्रम मागे टाकत उच्चांक गाठला आहे. उन्हामुळे विजेची मागणी वाढली आहेच शिवाय औद्योगिकरणाचाही परिणाम आहे. देशभरातील स्थिती सकारात्मक असली तरी सोलापुरातील विजेची मागणी स्थिर आहे. नवीन उद्योगधंदे येत नसल्याने महाराष्ट्रातील इतर शहरांच्या तुलनेत सोलापुरातील विजेची मागणी कमी असल्याचे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदविले आहे. 

गेल्या आठवड्यात (27 एप्रिल) देशाचे ऊर्जा सचिव अजय भल्ला यांनी ट्विटरवरून 176724 मेगावॉट इतका विजेच्या मागणीचा उचांक गाठल्याचे कळविले. गेल्या वर्षीचा 18 सप्टेंबर 2018 रोजीचा 175590 मेगावॉट उच्चांक मोडीत निघाला आहे. विक्रमी वीज मागणीच्या काळात महाराष्ट्राची मागणी इतर राज्याच्या तुलनेत सर्वांत जास्त म्हणजे 22697 मेगावॉट इतकी होती. विजेची एकंदरीत मागणी आणि वापर यामधून महाराष्ट्र औद्योगिक, आर्थिक व मानवी विकासाची उंची जोमाने गाठतोय हे दिसून येत आहे. विजेच्या मागणीच्या काळात महाराष्ट्राच्या खालोखाल उत्तरप्रदेश 19370 मेगावॉट, गुजरात 17609 मेगावॉट, तमिळनाडू 15532 मेगावॉट, कर्नाटक 12688 मेगावॉट, राजस्थान 10343 मेगावॉट इतकी होती. क्षेत्रीय विजेच्या मागणीची तुलना केली तर पश्‍चिम क्षेत्राची आणि त्या खालोखाल उत्तर क्षेत्राची विजेची मागणी देशात सर्वाधिक आहे. 

31 मार्च 2019 च्या केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या अहवालानुसार देशाची स्थापित ऊर्जेची क्षमता ही 356100 मेगावॉट इतकी आहे. स्थापित क्षमतेच्या तुलनेत सर्वाधिक विजेची मागणी ही फक्त 49.62 टक्के इतकीच आहे. महाराष्ट्राची स्थापित ऊर्जेची क्षमता ही 44143 मेगावॉट असून स्थापित क्षमतेच्या तुलनेत सर्वाधिक विजेची मागणी ही फक्त 51.41 टक्के एवढीच आहे. सोलापूर जिल्ह्याची स्थापित ऊर्जेची क्षमता ही जवळपास 1000 मेगावॉट असून स्थापित क्षमतेच्या तुलनेत सर्वोचांक विजेची मागणी 45.30 टक्के इतकीच असल्याचे वीजपुरवठा क्षेत्रातील अभ्यासक, अभियंता अमेय केत यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

वीज प्रत्येकासाठी या योजनेतून शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विद्युतीकरण होत आहे. शेतकऱ्यांना व औद्योगिकरणाला हक्काची वीज देण्याच्या प्रयत्नातून विजेच्या मागणीत वाढ होत आहे. वाढीव विजेची मागणी पाहता औद्योगिक व मानवी विकास साधत आर्थिक प्रगतीमधून भारत देशाची महासत्ता बनेल असे वाटते, असा विश्‍वासही श्री. केत यांनी व्यक्त केला. आपण जास्त प्रमाणात अवलंबून असणाऱ्या व स्वस्त अशा जलविद्युत निर्मितीवर कमी पर्जन्यमान आणि वाढत्या तापमानामुळे पाण्याची टंचाई होऊन परिणाम होत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले 

देशातील विक्रम विजेच्या मागणीच्या काळात सोलापूर जिल्ह्याची मागणी ही मात्र 453 मेगावॉट इतकीच होती. 31 जानेवारीच्या अहवालानुसार सोलापूर जिल्ह्याची गेल्यावर्षीची मागणी 716 मेगावॉट होती. या विजेच्या एकंदरीत मागणी आणि वापर यामधून सोलापूर जिल्ह्याची औद्योगिक, आर्थिक व मानवी विकासाचा वेग हा इतर शहराच्या मानाने संथ असल्याचे दिसून येत आहे. 

नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर येथे विजेची मागणी अधिक असल्याचे अहवालातून समोर आले आहे. चांगल्या कामांसाठी विजेचा वापर वाढायला हवा. नवीन उद्योग येत नसल्याने सोलापुरात विजेची अपेक्षित मागणी नाही. चांगल्यासोबत जसं वाईट जोडून येत म्हणतात अगदी तसंच अपेक्षित चांगल्या वीज वापरासोबत अनावश्‍यक वीज वापरही वाढला आहे. अनावश्‍यक वीज वापर, विजेची चोरी या बाबी विकासात अडथळा आहेत. हे टाळण्यासाठी सजग नागरिक बनून प्रत्येकाने विजेचा आवश्‍यक तेवढाच वापर करावा. विजेचा मोबदला म्हणजेच वीज बिल वेळेवर भरावे. 
- अमेय केत, उपकार्यकारी अभियंता, महापारेषण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com