सुवर्णा पत्कींकडील उपाधीक्षकचा पदभार काढून घेण्याची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

सांगली - मिरजेत पीडित तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी निलंबित झालेल्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्याकडील "डीवायएसपी' पदाचा कार्यभार काढून घ्यावा, यासह इतर मागण्यांसाठी नातेवाइकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. आठ दिवसांत मागण्या मान्य न झाल्या नाहीतर बेमुदत उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे. 

सांगली - मिरजेत पीडित तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी निलंबित झालेल्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्याकडील "डीवायएसपी' पदाचा कार्यभार काढून घ्यावा, यासह इतर मागण्यांसाठी नातेवाइकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. आठ दिवसांत मागण्या मान्य न झाल्या नाहीतर बेमुदत उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर संशयित अमित कुरणेला पोलिसांनी अटक केली नाही. उलट पीडित तरुणीवर खंडणीचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे भयभीत झालेल्या तरुणीने आत्महत्या केली. खंडणीचा गुन्हा दाखल करून घेणाऱ्या निरीक्षक पत्कींना तातडीने निलंबित करण्यात आले. परंतु या प्रकरणात पत्कींना पाठीशी घालण्याचे काम पोलिस यंत्रणेने केले आहे. नुकतेच पत्कींकडे उपाधीक्षक (गृह) पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. 

आत्महत्या केलेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनी न्यायालयीन कामासाठी लागणारी कागदपत्रे पोलिस अधीक्षक यांच्याकडे मागणी केली. परंतु आजपर्यंत कुटुंबाला कागदपत्रे उपलब्ध करून दिली गेली नाहीत. उलट मागणीचे अर्ज पत्कींकडेच वर्ग केले जातात. त्यामुळे कागदपत्रे मिळत नाहीत. पीडित तरुणीच्या नातेवाइकांना आजपर्यंत न्याय मिळू शकलेला नाही. गुन्ह्याचा तपासही व्यवस्थित केला जात नाही. 

पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिस उपमहासंचालक श्री. यादव यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांना अहवाल देण्यास सांगितले. परंतु त्याचीही अंमलबजावणी झाली नाही. निरीक्षक पत्की, दोषी पोलिस आणि कुरणे कुटुंबाला पाठीशी घालण्याचे काम केले जात आहे. पत्की यांना बडतर्फ करून सहआरोपी केले पाहिजे. त्यांच्याकडील उपाधीक्षक पदाचा कार्यभार काढून घ्यावा. गांधी चौक पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्या प्रकरणाचीही चौकशी करावी. माहिती अधिकार अंतर्गत मागितलेली कागदपत्रे तत्काळ द्यावीत. आठ दिवसांत मागण्या मान्य झाल्यास पुन्हा बेमुदत उपोषण केले जाईल. 

ऍड. प्रविणा हेटकाळे, कलगोंडा पाटील, रवींद्र पाटील, काशाक्का पाटील, संगीता पवार, साजिदा बेपारी, रवींद्र पाटील, अभिजित हारगे, बसगोंडा पाटील, सुभाष हारगे आदी आंदोलनात सहभागी झाले.

Web Title: The demand to withdraw the charge of Suvarna patki