एका मतानेही लोकशाही होऊ शकते बळकट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

सोलापूर - ‘‘एका मतानेही लोकशाही बळकट होऊ शकते. त्यामुळे मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे’’, असे आवाहन महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त जे. एस. सहारिया यांनी केले. 

सोलापूर महापालिकेसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होत आहे. या पार्श्‍वभूमीवर श्री. सहारिया ‘सकाळ’शी बोलत होते. निवडणुकीच्या तयारीसाठी केलेल्या नियोजनाचीही त्यांनी माहिती दिली. 

श्री. सहारिया म्हणाले, ‘‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया लक्षात घेतल्यास जागा आणि त्यासाठीच्या उमेदवारांची संख्या फार मोठी असते. मोठी यंत्रणा यात सहभागी असते. यंत्रणेने कायद्याचे तंतोतंत पालन करून या निवडणुका अधिकाधिक मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची सूचना केली आहे.’’ 

‘‘आचारसंहिता कालावधीत मतदारांना प्रभावित करणे किंवा प्रलोभन दाखविण्यासाठी उमेदवार आणि राजकीय पक्षांकडून नवनवीन मार्ग शोधले जातात. हे लक्षात घेऊन योग्य ती दक्षता घेण्याचे आदेश सर्व शासकीय यंत्रणांना देण्यात आले आहेत. आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे, खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे, मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी वस्तूंच्या वाटपावर अंकुश ठेवणे यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे’’, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले. 

लोकशाहीचा आधारस्तंभ
निवडणूक प्रक्रियेतील सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे मतदार होय. मतदार हा लोकशाहीचा मुख्य आधारस्तंभ आहे. मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडून योग्य त्या उमेदवारांना मतदान करावे, असेही श्री. सहारिया म्हणाले.

Web Title: Democracy can be strengthened in one vote