जप्त केलेल्या 83 लाखांच्या चौकशीकडे लक्ष 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

सांगली : पाचशे व हजाराच्या नोटाबंदीनंतर पोलिसांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी 83 लाखांची रोकड जप्त केली. रोकड जप्त केल्यानंतर प्राप्तीकर विभागाला कळवून केवळ पोलिस नामानिराळे राहिले असे चित्र दिसते. त्यामुळे आता प्राप्तीकर विभागाच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे रोकड जप्त प्रकरणात काही पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चाही रंगू लागली आहे. 

सांगली : पाचशे व हजाराच्या नोटाबंदीनंतर पोलिसांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी 83 लाखांची रोकड जप्त केली. रोकड जप्त केल्यानंतर प्राप्तीकर विभागाला कळवून केवळ पोलिस नामानिराळे राहिले असे चित्र दिसते. त्यामुळे आता प्राप्तीकर विभागाच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे रोकड जप्त प्रकरणात काही पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चाही रंगू लागली आहे. 

8 नोव्हेंबरला मध्यरात्रीपासून पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर अनेकांची तारांबळ उडाली. काळा पैसा खपवण्यासाठी खटाटोप सुरू झाले. 10 नोव्हेंबरपासून बॅंकेत खात्यावर नोटा भरण्यासाठी तसेच नोटा बदलून घेण्यासाठी रांगा लागल्या. तशातच पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली. इस्लामपूर, तासगाव, विटा आणि सांगलीत पोलिसांना सहा कारवायांमध्ये 83 लाखांची रोकड मिळाली. पोलिसांनी ती जप्त करून प्राप्तीकर विभागाला कळवले. 

पोलिसांनी जप्त केलेल्या नोटांची पार्श्‍वभूमी पाहिली तर नोटा घेऊन जाणारे सर्वजण संशयितच वाटतात. नोटा बदली करून देण्यासाठीच त्यांचा प्रयत्न सुरू असताना ते पकडले गेले. पोलिसांनी नोटा ताब्यात घेऊन त्याची नोंद केवळ स्टेशन डायरीतच केली. त्यानंतर प्राप्तीकर विभागाला कळवून तपासाची कटकट संपवून टाकली. नोटा जप्त केलेल्या प्रकरणात संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना कारवाईबाबत विचारल्यानंतर ते प्राप्तीकर विभागाकडे बोट दाखवून मोकळे होतात. परंतु पोलिसांनी ज्यांच्याकडून नोटा जप्त केल्या ते पुढे काय करणार होते? कोणाकडून नोटा बदलून घेणार होते? याची किरकोळ चौकशी करण्यापलीकडे काहीच झाले नाही. 

पोलिसांनी सहा कारवायांत 83 लाखांची रोकड जप्त केली. यापैकी काही कारवाईबाबत उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे. पोलिसांनी कारवाईपेक्षा अधिक रोकड जप्त केल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. त्यातून पोलिस ठाणे स्तरावर एक नंबर आणि दोन नंबरच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्यापर्यंतही चर्चा कानावर येत आहे. तसेच काही कारवाईमध्ये गोलमाल झाल्याचे वृत्तही कानावर पडत आहे. प्राप्तीकर विभाग जप्त झालेल्या नोटाबाबतच चौकशी करून कारवाई करेल. प्रत्यक्षात किती नोटा होत्या? जप्त किती झाल्या? याचा खोलवर तपास केला जाईल काय? याबाबत साशंकता आहे. 

"एलसीबी' कडून चौकशी- 
शहर पोलिसांनी 19 लाख 30 हजार रुपये आठवड्यापूर्वी जप्त केले. पोलिसांनी स्टेशन रस्त्यावर कारवाई केल्याची चर्चा नागरिकांत रंगली. परंतु पोलिसांनी बायपास रस्त्यावर नोटा जप्त केल्याचे सांगितले. "एलसीबी'ला सुगावा लागल्यानंतर त्यांचे अधिकारी मध्यरात्री पोलिस ठाण्यात आले होते. दुसऱ्या दिवशीही त्यांनी चौकशी केली. त्यामुळे यामागे "गोलमाल' आहे काय? अशी शंका व्यक्त होत आहे.

Web Title: Demonetisation : effects and inquiry in Kolhapur of old notes