राशीनसह परिसरात डेंगीचे थैमान  ​

Dengue in the area with rashine
Dengue in the area with rashine

राशीन : राशीनसह परिसरात सध्या साथींच्या आजारांसह डेंगीच्या आजाराने थैमान घातले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये डेंगीच्या आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे.

अनेक रुग्णांना बारामती व पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. डेंगीसह गोचीड ताप, चिकुनगुण्या आदी आजारांचे रुग्णही मोठ्या प्रमाणात आहेत. या आजारांना आटोक्‍यात आणण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीतर्फे तातडीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. 


सर्दी-ताप, खोकला, कणकण, अंगदुखी आणि पेशी कमी होण्याचे लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. लांबलेल्या पावसाने झालेली दलदल, सार्वजनिक ठिकाणचा कचरा, वाढलेले गवत, तुंबलेल्या गटारांमुळे डासांची प्रचंड उत्पत्ती वाढली असल्याने साथींच्या आजारात भर पडली आहे. जगदंबादेवी मंदिर परिसर, साठेनगर, मासाळ कॉलनी, साळवे कॉलनी, मंगळवार पेठ, माळवाडी, जगदंबा सोसायटी, संत रोहिदासनगर, आंबेडकरनगर, सावता माळीनगर आदी भागांत साथींचे रुग्ण आहेत. 

ग्रामपंचायतीतर्फे गावांमध्ये धूर फवारणी करण्यात आली आहे. मात्र, त्याने डासांच्या उत्पत्तीत फारसा फरक पडलेला नाही. तुंबलेल्या गटारांतील पाणी वाहते करून देणे गरजेचे आहे. यावर डासअळी प्रतिबंधक फवारणी करणे गरजेचे आहे. डेंगीच्या आजाराचा खर्च मोठा असल्याने हातावर पोट असणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

रक्त-लघवी तपासणी, सलाईन, गोळ्या, औषधे आणि रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च सर्वसामान्यांना झेपेनासा झाला आहे. हे आजार तातडीने आटोक्‍यात आणण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने संयुक्तपणे पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. 

ग्रामस्थांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता संकलित करून कचऱ्याच्या गाडीत टाकावा. आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळावा. ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक ठिकाणे, तुंबलेली गटारे साफ करण्याचे काम आणि धूर फवारणी सुरू करण्यात आली आहे. 
- नीलम साळवे, सरपंच, राशीन 

डेंगीचे संशयित रुग्ण राशीन परिसरात आहेत. त्यावर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागातर्फे फिव्हर आणि कंटेनर सर्व्हे सुरू आहे. ग्रामपंचायतीस फॉगिंगच्या सूचना दिल्या आहेत. डेंगीबाबत पत्रके काढून शाळांमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन जनजागृतीचे काम सुरू करीत आहोत. साठवलेल्या पाण्यात डासांच्या अळ्या तयार होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. लोकांनी घाबरून न जाता उपचार घ्यावेत. 
- डॉ. संदीप पुंड, तालुका वैद्यकीय अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com