डेंगीची आठ दिवसांत 230 जणांना लागण 

डेंगीची आठ दिवसांत 230 जणांना लागण 

कोल्हापूर - डेंगीचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत असून गेल्या आठ दिवसांत 230 जणांना डेंगीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारी दवाखान्यात 128, खासगी दवाखान्यातून 102 जणांच्या रक्ताच्या चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

जूनमध्ये हीच आकडेवारी 508 इतकी होती. यात सरकारी दवाखान्यातील 217, खासगीतील 291 रुग्णांचा समावेश होता. धनवडे गल्ली, दुधाळी, सोमेश्‍वर गल्ली, राजाराम चौक, जवाहरनगर, मंगळवार पेठ, भोसलेवाडी, जाधववाडी, मुक्त सैनिक वसाहत, राजेंद्रनगर, लक्ष्मी वसाहत, संभाजीनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, यादवनगर, राजारामपुरी, कनाननगर झोपडपट्टी येथे सर्व्हे झाला. 

तापाच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. एका खासगी दवाखान्यात दिवसाला सुमारे दोनशे रुग्ण तपासले जात आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात 230 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाची यंत्रणा जागी झाली आहे. सर्व प्रभागात पुन्हा एकदा मोहीम राबविण्याचा विचार सुरू आहे. औषध फवारणी, धूरफवारणीने डेंगीचे उच्चाटन होत नाही. जास्त दिवस ठेवलेले पाणी ओतून देणे, फ्रीजच्या कंडेन्सरमध्ये अळ्या होणार नाहीत, याची लोकांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 

जूनमध्ये डेंगीने डोके वर काढले. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. सरकारी दवाखान्यापेक्षा खासगीत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. संबंधित रुग्णालयाने सीपीआरला अहवाल पाठविला तरच डेंगीची लागण झाल्याचे स्पष्ट होते. जी रुग्णालये माहिती कळवत नाहीत, त्यांच्याकडे नेमके किती रुग्ण आहेत याची माहिती उपलब्ध होऊ शकत नाही. 

जुने टायर, नारळाच्या करवंट्या, घराची पन्हाळी, टेरेसवरील पाण्याच्या टाक्‍या, बांधकाम साईटवरील पाण्याच्या टाक्‍या डेंगीच्या अळ्यांचे आगर आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रसंगी "आशा' कर्मचाऱ्यांची मदत घेऊन घरोघरी सर्व्हे करा, जी रुग्ग्णालये माहिती देणार नाहीत त्यांची नावे आरोग्य विभागाला कळवावीत, असे आवाहन आरोग्याधिकाऱ्यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com