डेंगीच्या आढावा बैठकीत महापौरांनी अधिकाऱ्यांन घेतले फैलावर

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

शहरात डेंगी आणि स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव झालेला असताना महापालिकेचा आरोग्य विभाग तितकासा गंभीर नाही. नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासाठी 40-50 हजार रुपयांचा पगार मिळतो का तुम्हाला'' अशा शब्दात महापौर शोभा बनशेट्टी यांनी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. 

सोलापूर- "शहरात डेंगी आणि स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव झालेला असताना महापालिकेचा आरोग्य विभाग तितकासा गंभीर नाही. नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासाठी 40-50 हजार रुपयांचा पगार मिळतो का तुम्हाला'' अशा शब्दात महापौर शोभा बनशेट्टी यांनी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. 

स्थायी समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीस उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर आरोग्य अधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांची अक्षरश: फ्याफ्या उडाली. अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिल्याने सर्वानाच धारेवर धरले. अधिकाऱ्यांकडे आजारांची माहिती नसल्याने महापौर शोभा बनशेट्टी याही चांगल्याच भडकल्या. शहरवासीयांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची तंबी महापौरांनी दिली. 

सभागृह नेते संजय कोळी यांनी ही बैठक बोलावली होती. उपमहापौर शशिकला बत्तुल, नगरसेवक राजकुमार हंचाटे , आनंद चंदनशिवे, किसन जाधव, बाबा मिस्त्री, श्रीनिवास करली, गणेश पुजारी, आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, हिवताप अधिकारी स्वाती इंगळे, जनसंपर्क अधिकारी विजय कांबळे, एस.एफ. डब्ल्यू. गणेश माने उपस्थित होते. 

शहरात डेंगूचे किती रुग्ण आहेत, यासंदर्भात आरोग्य प्रशासनाने काय कार्यवाही केली, उपाययोजना कोणत्या केल्या यासह विविध प्रश्नांचा पदाधिकाऱ्यांनी भडीमार केला. आरोग्य अधिकारी नवले यांच्यासह मलेरिया विभागातील अधिकाऱ्यांकडे अशी माहिती नसल्याचे दिसून आले. थातुरमातुर उत्तरे अधिकाऱ्यांनी दिली. कार्यवाही सुरू असल्याची खोटी माहिती अधिकाऱ्याने दिल्याचे स्पष्ट दिसून आले. यामुळे गटनेते चंदनशिवे व जाधव यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या आजाराशी संबंधित माहिती तुमच्याकडे नाही, तुमचा काय उपयोग? केवळ कार्यालयात बसायला येता का? पोरखेळ लावला असल्याच्या शब्दात गटनेत्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. 

84 जणांना डेंगी, तीन जणांना स्वाईन फ्लू 
ऑगस्ट महिन्यात 84 रुग्णांना डेंगीची, तर तीनजणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती डॉ. नवले यांनी यावेळी दिली. शहरात डेंगीने एकही रुग्ण दगावला नसल्याची माहिती डॉ. नवले यांनी दिल्यावर, डेंगीने बळी जाण्याची वाट पहात आहात का, अशी विचारणा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली. या संदर्भात आयुक्तांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dengue review meeting in Solapur MNP