डेंगी : डंख छोटा, धोका मोठा...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 ऑगस्ट 2016

डेंगीचा प्रादुर्भाव वाढला आहे. पण त्याला घाबरून न जाता नागरिकांनी स्वच्छतेची दक्षता घ्यावी. तीन प्रकार असले तरी त्यातील दोन सौम्य आहे. एकच प्रकार धोकादायक आहे. रुग्णांनी वेळच्या वेळी डॉक्‍टरांचा सल्ला आणि विश्रांती घेतली, तर धोका टळू शकतो. डेंगी होऊ नये यासाठी साठवलेले जलकुंभ धुवून कोरडे करून पुन्हा वापरावेत. डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी काळजी घ्यावी.

- डॉ. अनिल मडके, सांगली.

पाऊस पडला की साचलेले पाणी व उकिरडे यामुळे डासांची वाढ मोठ्या प्रमाणात होऊन साथीचे रोग म्हणजे डेंगी, मलेरिया, चिकनगुण्याचा फैलाव वातावरणात होतो. प्रामुख्याने डेंगीचा आजार साठवलेल्या स्वच्छ पाण्यात उत्पत्ती होणाऱ्या पांढऱ्या व दिवसा चावणाऱ्या एडिस इजिप्त डासाच्या मादीमुळे होतो. डेंगी आजार ठराविक वेळापत्रकाप्रमाणे वागतो व लक्षणे जरी वेगवेगळी असली, तरी प्रथम लक्षणांपासून ते बरे वाटेपर्यंत कालावधी साधारण दहा दिवसांपेक्षा जास्त नसतो. शहरात सध्या डेंगीचा फैलाव झाला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. महापालिकेची यंत्रणा कुचकामी असून नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. 

 

शंभरावर रुग्ण 

गेल्या पंधरा दिवसांत महापालिका क्षेत्रातील संशयित १२० रुग्ण आढळले, त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. त्यापैकी १५ जणांना डेंगीची बाधा झाल्याचा वैद्यकीय अहवाल सांगतो. शहरातील १४७२ रुग्ण तपासण्यात आले आहेत. ९५ हजार ५१५ घरांपर्यंत आरोग्य सेवक जाऊन रुग्णशोध मोहीम राबवण्यात आली आहे. 

 

इतर लक्षणे व निदान 

डोकेदुखी, अंग दुखणे, भूक मंदावणे, चक्‍कर येणे, थंड घाम सुटणे, उलटी होणे, अंगावर गोवरासारखी पुरळ येऊन खाज येणे, डोळे लाल होणे, गंभीर स्थितीमध्ये प्लेटलेट्‌स (पेशी) कमी होऊन रक्तस्राव होऊ शकतो. वरील सर्व लक्षणांपासून डेंगी व निदान करणे अवघड नाही. तरीसुद्धा डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार रक्त तपासण्या करून लवकरात लवकर औषधोपचार घेऊन या आजारापासून मुक्तता मिळू शकते. 

 

यंत्रणा कुचकामी 

डेंगीचा फैलाव वाढला असून कागदोपत्री खेळ चालू आहेत. धूर फवारणीतही टाळाटाळ केली जात आहे. विशेष म्हणजे ३१ मशीनपैकी केवळ चारच मशीन चालू स्थितीत आहे. त्यामुळे संशयित रुग्ण आढळलेल्या भागातच फवारणी केली जात आहे. सरसकट सर्वत्र फवारणी होत नाही. आयुक्तांनी दुरुस्तीचे आदेश देऊनही अद्याप ‘जैसे थे’च स्थिती आहे.

 

अपार्टमेंट, कॉम्प्लेक्‍समधील सांडपाण्याचा धोका 

शहरात सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्थाच नाही. आपार्टमेंट, कॉम्प्लेक्‍सचे सांडपाणी तसेच रस्त्यावर सोडले जाते. त्यामुळे दुर्गंधी होऊन मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढला. महापालिकेचा आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करतो. यासाठी डबक्‍यांमध्ये गप्पी मासे सोडावेत. तसेच जळके ऑईल टाकल्याने डासांची उत्पत्ती थांबते. नागरिकांनी व्यक्तिगत पातळीवरही हे प्रयत्न करावेत.

 

डेंगीची लक्षणे

सुरवातीला ताप येणे, अंग भरून येणे, ४-५ दिवस ताप वारंवार येणे, गळाल्यासारखे वाटणे, वैद्यकीयदृष्ट्या जोपर्यंत अंगात ताप आहे तोपर्यंत रुग्ण गंभीर असतो. रक्तातील प्लेटलेट्‌स (चपट्या पेशी) या दीड लाखापेक्षा जास्त असतात. बऱ्याच जणांना ताप आल्यानंतर वैद्यकीय सल्ल्याची गरज भासत नाही, पण डेंगीचा ताप उतरल्यानंतर रुग्ण गंभीर होण्याची शक्‍यता जास्त असते. डेंगीत होणारे दुष्परिणाम ६-९ दिवसांपर्यंत असतात.

Web Title: Dengue: a small stick, a big risk ...