लागण राजस्थानात; उपचार सोलापुरात

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 7 जुलै 2018

डेंगीसदृश आजाराचे रुग्ण आढळलेल्या परिसरात धुरावणी करण्यात येत आहे. तसेच घरोघरी जाऊन पाणी टाक्‍या तसेच कंटेनरही तपासले जात आहेत. ज्या ठिकाणी तीनपेक्षा जास्त दिवस पाणी साठविलेल्या टाक्‍या आहेत, त्या रिकाम्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
- स्वाती इंगळे, जीवशास्त्रज्ञ, महापालिका हिवताप विभाग

सोलापूर : शहर व परिसरात  डेंगीसदृश आजाराची लागण झालेले 27 रुग्ण आढळले. त्यापैकी सहा जणांचा अहवाल "पॉझिटिव्ह' आला आहे. पैकी दोन जण राजस्थान व हैदराबादमधील आहेत. त्यांना त्यांच्या मूळगावी लागण झाली असून, उपचार सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरू आहेत. 

 शहर व हद्दवाढ भागात जानेवारी ते जून या कालावधीत डेंगीसदृश आजाराची लागण झालेले 130 रुग्ण आढळले. उपचारानंतर हे रुग्ण बरे झाले आहेत. हिवताप विभागामार्फत शहराच्या विविध भागात एक लाख 98 हजार 549 ठिकाणच्या पाणी साठवलेल्या ठिकाणची तपासणी करण्यात आली. त्यापैकी पाच हजार 432 कंटनेर, भांड्यांत लारव्हा (अळ्या) आढळल्या. 

शहर व हद्दवाढीच्या घरातील हौद, कुलरमधील पाणी, रिकामे टायर, गेल्या सात ते आठ दिवसांपासून साठविण्यात आलेले पाणी असे स्वरूप या घरांमध्ये होते. या घरमालकांना पाणी टाकून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सापडलेले डास हे अळीच्या स्वरूपात होते. हे पाणी आणखी चार ते पाच दिवस तसेच ठेवले असते, तर अळीचे रूपांतर डासात होऊन, त्यापासून डेंगी व चिकुनगुनियाचा प्रसार झाला असता. 

हिवताप विभागाने तयार केला कृती आराखडा 
साथ रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हिवताप विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार धुरावणी व फवारणीचे वेळापत्रक निश्‍चित केले आहे. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या सूचनेनुसार हिवताप कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती विभागीय कार्यालयाकडे करण्यात आली आहे. हे कर्मचारी पहाटे सहा ते दुपारी दोन या वेळेत कार्यरत राहणार आहेत. 

डेंगीसदृश आजाराचे रुग्ण आढळलेल्या परिसरात धुरावणी करण्यात येत आहे. तसेच घरोघरी जाऊन पाणी टाक्‍या तसेच कंटेनरही तपासले जात आहेत. ज्या ठिकाणी तीनपेक्षा जास्त दिवस पाणी साठविलेल्या टाक्‍या आहेत, त्या रिकाम्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
- स्वाती इंगळे, जीवशास्त्रज्ञ, महापालिका हिवताप विभाग

Web Title: dengue in Solapur