कोरोनासह डेंगीचाही पसरतोय विळखा...प्रशासन खबरदारीत ढिम्म...शामरावनगरसह उपनगरांत डासांचे प्रमाण वाढले 

बलराज पवार
सोमवार, 13 जुलै 2020

सांगली-  कोरोनाचा प्रसार रोखण्याचे आव्हान असताना महापालिका क्षेत्रात आता डेंगीचाही विळखा वाढू लागला आहे. शामरावनगरसह उपनगरांत पावसामुळे सखल भागात पाणी साचून राहत असल्याने डेंगीच्या डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे डेंगीचे रुग्ण खासगी रुग्णालयांत दाखल होऊ लागले आहेत. मात्र कोरोनात अडकलेल्या महापालिका आरोग्य विभागाचे डेंगी रोखण्याकडे दुर्लक्ष होत आहे. 

सांगली-  कोरोनाचा प्रसार रोखण्याचे आव्हान असताना महापालिका क्षेत्रात आता डेंगीचाही विळखा वाढू लागला आहे. शामरावनगरसह उपनगरांत पावसामुळे सखल भागात पाणी साचून राहत असल्याने डेंगीच्या डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे डेंगीचे रुग्ण खासगी रुग्णालयांत दाखल होऊ लागले आहेत. मात्र कोरोनात अडकलेल्या महापालिका आरोग्य विभागाचे डेंगी रोखण्याकडे दुर्लक्ष होत आहे. 

महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण रोज वाढत आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्र चिंतेत असताना आता डेंगीचीही साथ पसरु लागली आहे. खासगी रुग्णालयात डेंगीचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. उपनगरांत महापालिकेचे मोठ्या संख्येने मोकळे प्लॉट आहेत. तेथे पावसाचे पाणी साचून राहते. अशा पाण्यात डेंगीच्या डासांची उत्पत्ती वेगाने होत आहे. त्यामुळे डेंगीची साथही पसरु लागली आहे. मात्र याकडे लक्ष देण्यास महापालिका आरोग्य विभागाला वेळ नाही. 

फवारणी कोलमडली 

महापालिकेने डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभागनिहाय औषध आणि धूर फवारणीचे नियोजन केले होते. परंतू या वेळापत्रकाप्रमाणे औषध फवारणीही केली जात नाही. नागरिकांना काळजी घेण्याची सूचना करणे एवढेच काम आरोग्य विभागाने केले जाते. 

सारखी लक्षणे हीच अडचण 

सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यात पावसाळ्यात डेंगीचे रुग्णही वाढत आहेत. या दोन्हीत थंडी, ताप ही समान लक्षणे आहेत. पावसाळ्यात घसा दुखणे, खवखवणे असेही प्रकार सुरू आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयात या लक्षणांचा रुग्ण आला, की डॉक्‍टरांचीही अडचण होत आहे. "डेंगी म्हणून तपासायचे की कोरोना म्हणून काळजी घ्यायची?' असा प्रश्‍न पडत आहे. खासगी रुग्णालयातही काळजी घेऊन उपचार करावे लागत आहेत. 

नागरिक खोटी माहिती देतात 
सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने कंटेन्मेंट झोनही वाढलेत. पण, खासगी रुग्णालयात गेलेला रुग्ण कंटेन्मेंट झोनमधून आल्याचे लपवून ठेवतो. बाहेरगावी प्रवास करुन आल्याचे सांगत नाही. डेंगी आणि कोरोनाच्या समान लक्षणामुळे डॉक्‍टर रुग्णांवर उपचार करतात. मात्र त्यातून फारसा धोका पत्करण्यापेक्षा मग थेट सिव्हील किंवा भारती हॉस्पिटलला पाठवले जाते. 

आमराईत गप्पी पैदास केंद्र 
महापालिकेच्यावतीने डेंगी डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आमराईत जुन्या कारंजाच्या हौदात गप्पी मासे पैदास केंद्र सुरु करण्यात आलेय. हे मासे नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. नागरिकांनी गप्पी मासे नेऊन आजूबाजूला पाण्याच्या डोहात, साचलेल्या पाण्यात, सार्वजनिक ठिकाणी सोडावेत. गप्पीमासे डेंगी तसेच चिकगुण्याच्या डांस अळ्या खातात. त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखण्यास मदत होते. 

 

""सध्याच्या वातावरणात डेंगीचे रुग्णही वाढत आहेत. मात्र कोरोना आणि डेंगीची काही लक्षणे समान असल्याने धोका पत्करणे अवघड होते. नागरिकांनी कुठलीही माहिती लपवून न ठेवता खरी माहिती द्यावी. म्हणजे उपचार करताना काळजी घेता येते.'' 

-डॉ. बी. आर. पलंगे (एम.डी.) 

 

संपादन : घनशाम नवाथे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dengue is spreading along with corona. Mosquitoes have increased in the suburbs including Shamrawan