डेंगीने घेतला चिमुकलीचा बळी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

कोल्हापूर : गेल्या आठवड्यात कनाननगरमधील मेघा प्रशांत कोळी (वय 9) ही चिमुरडी सामान्य मुलांसारखी हसत खेळत होती. काही दिवसांपूर्वी शाळा सुरू झाल्याने नव्या मैत्रिणींसोबत धडे गिरवत होती. चार दिवसांपूर्वी तिला तापाचे निमित्त झाले आणि कोळी दाम्पत्याची धावाधाव सुरू झाली. मुलगी बरी व्हावी, यासाठी दाम्पत्याने तीन-चार दवाखाने पालथे घातले. मेघा मात्र तापाने फणफणत राहिली आणि अखेर तिला डेंगीपुढे हार पत्करावी लागली. शनिवारी तिचा मृत्यू झाला आणि या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. 

गुजरीत साफसफाई करून उदरनिर्वाह करून जगणाऱ्या कोळी दाम्पत्याची मेघा चुणचुणीत मुलगी. तिसरीला पंचाहत्तर टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेली. भवानी मंडपातील महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी. शाळेतील मैत्रिणींसमवेत हसत-खेळत अभ्यासात रमणारी. काही दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे शाळेत गेली. घरी आल्यानंतर तापाने फणफणली. तिच्या आई-वडिलांची काळजी वाढली. लगेच त्यांनी तिला खासगी दवाखान्यात नेले; पण ताप काही कमी झाला नाही. दोन-तीन दवाखाने पालथे घातल्यावर तिला डेंगी झाल्याचे स्पष्ट झाले आणि कोळी दाम्पत्य हादरून गेले. 

तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. दवाखान्यात मुलगीच्या नाका-तोंडात घातलेल्या पाईप पाहून त्यांचे मन हेलावून गेले. अखेर प्रयत्नांपुढे नियतीचा खेळ यशस्वी ठरला आणि शनिवारी (ता. 7) रात्री मेघाची प्राणज्योत मालवली. तिच्या मृत्यूने कोळी दाम्पत्य अजूनही सावरलेले नाही. तिचा भाऊ विनोद याला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आज तिच्या शाळेचे कामकाज बंद ठेवून तिला आदरांजली वाहण्यात आली. 

मेघा हुशार होती. तिला शालेय साहित्य कमी पडू नये, याची आम्ही काळजी घेत होतो. तिने खूप शिकावे, अशी आमची इच्छा होती; पण ती आम्हाला सोडून गेली. आता आम्ही कोणासाठी जगायचे? महापालिकेला लोकांच्या जीवाचे मोल कधी कळणार? 
- प्रशांत कोळी, मेघाचे वडील 

Web Title: Dengue took the victim

टॅग्स