सांगली-मिरज सिव्हिल "महालॅब'च्या सेवांपासून वंचितच; महागड्या चाचण्यांचा रुग्णांना भुर्दंड

Deprived of Sangli-Miraj Civil "Mahalab" services; expensive tests make patients sick
Deprived of Sangli-Miraj Civil "Mahalab" services; expensive tests make patients sick

सांगली : महालॅबशी संलग्न नसल्याने सांगली-मिरज सिव्हिलमधील कोरोना रुग्णांना महागड्या वैद्यकीय चाचण्यांसाठी पैसे मोजावे लागत आहेत. केवळ तांत्रिक कारणास्तव हा भुर्दंड बसत आहे. महालॅबचा सार्वजनिक आरोग्य विभागाशी करार असल्याने त्यांच्याशी संलग्न जिल्हा रुग्णालये, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये विविध चाचण्या मोफत होतात. वैद्यकीय उच्च व तंत्र शिक्षण विभागाशी महालॅबचा करार नाही. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणच्या अखत्यारीत येणारी सांगली आणि मिरजेतील शासकीय रुग्णालयांसह राज्यातील सर्वच अशा रुग्णालयांना हा फटका बसत आहे. 

कोरोना रुग्णांवरील उपचारात गरजेच्या ठरणाऱ्या डी डायमर, ट्रोपोनिन, इंटरल्युकीन 6 या आवश्‍यक चाचण्या शासनाच्याच महालॅब मोफत उपलब्ध होतात. एकीकडे कोविड रुग्णांची रक्त तपासणी महाराष्ट्र शासनाची नि:शुल्क प्रयोगशाळा असलेल्या "महालॅब'मार्फत करून घ्यावी असे आदेशही शासनाने दिले आहेत. तथापि महालॅबशी संलग्न जिल्हा रुग्णालयांमधेच या चाचण्या होतात.

सिव्हिलमध्ये त्या होऊ शकत नाहीत कारण त्यांची महालॅबशी संलग्नता नाही. महालॅबकडे सर्व काही यंत्रणा असताना त्याचा लाभ मात्र रुग्णांना मिळत नाही. कारण सार्वजनिक आरोग्य विभागाचा हिंदुस्थान लेटेक्‍स लिमिटेड कंपनीशी करार आहे. त्यानुसार महालॅबच्या सर्व सेवा सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्न असलेल्या जिल्हा रुग्णालये, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दिल्या जाऊ शकतात.

तशा या रुग्णालयांमधील रुग्णांना महालॅबच्या मोफत वैद्यकीय चाचण्यांचा लाभ मिळतोही. मात्र असा लाभ मिरजेतील आणि सांगलीतील सिव्हिलला मिळू शकत नाही कारण ती वैद्यकीय शिक्षणच्या अखत्यारीत येतात. ही खरे तर तांत्रिक अडचण मात्र त्यामुळे खर्चिक चाचण्यांचा भुर्दंड या रुग्णांना बसतो. 

महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या 

  • डी.डायमर (D-DIMER ) : डी डायमरचे प्रमाण वाढल्यास कोविडमध्ये रक्तवाहिन्याना सूज येऊन रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे गुंतागुंत वाढते. उदा. अर्धांगवायू, हृदयविकाराचा धक्का, मूत्रपिंड निकामी होणे, फुप्फुसात रक्ताच्या गुठळ्या होणे असे प्रकार होतात. या उपचारात ही चाचणी केली जाते. 
  • ट्रोपोनीन (TROPONIN) : हृदयाचे स्नायू खराब झाल्यानंतर ट्रोपोनीनची पातळी रक्तात वाढते. या चाचणीद्वारे त्याचा हृदयावरील परिणामाच्या प्रमाणाचे निदान होते. 
  • इंटरल्युकीन 6 [INTERLEUKIN] : रुग्णाची अवस्था समजून येण्यासाठी चाचणी केली जाते. सायटोकाइंन स्ट्रॉम होणार किंवा नाही समजते. 
  • मॅग्नेशियम [MAGNESIUM] : रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्ण व गर्भवती महिलांमधील मॅग्नेशियम पातळीवरील लक्ष ठेवण्यासाठी ही चाचणी केली जाते. 

अद्याप कोणत्याही सूचना नाहीत

महालॅब शासनाची नि:शुल्क वैद्यकीय प्रयोगशाळा आहे. मात्र तिची संलग्नता सिव्हिलशी नाही. त्यामुळे महालॅब वरील महत्त्वाच्या सर्व चाचण्यांसह सी.बी.सी, स्वादुपिंड, मूत्रपिंड कामकाज तपासणीसारख्या महत्त्वाच्या चाचण्यांपासूनही सिव्हिलचे रुग्ण वंचित राहतात. त्यांचा खासगी प्रयोगशाळांमध्ये सुमारे आठ ते नऊ हजार रुपये इतका खर्च असतो. कोरोनाशी संबंधित चाचण्या उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयामध्ये करण्याबाबत अद्याप कोणत्याही सूचना नाहीत. मात्र आम्ही आदेश आले तर तिथे हा लाभ देऊ शकतो. 
- सयाजीराव झांबरे, व्यवस्थापक, महालॅब 
 

रुग्णालयांना त्याचा लाभ मिळू शकतो

महालॅबच्या सेवांचा लाभ सिव्हिल होण्यासाठी हिंदुस्थान लेटेक्‍सशी वैद्यकीय शिक्षणचा करार व्हायला हवा. त्यानंतरच वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न हॉस्पिटल्सना महालॅबच्या मोफत चाचण्यांचा लाभ मिळेल. वैद्यकीय शिक्षण विभागाने स्वतंत्रपणेही एखाद्या कंपनीशी असा करार केल्यास त्याचा राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांना त्याचा लाभ मिळू शकतो.
- डॉ. संजय साळुंखे,  जिल्हा शल्यचिकित्सक 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com