कऱ्हाडला 12 पतसंस्था अवसायनात ; उपनिबंधकांचे नियंत्रण

कऱ्हाडला 12 पतसंस्था अवसायनात ; उपनिबंधकांचे नियंत्रण

कऱ्हाड  ः शहरासह तालुक्‍यातील सुमारे 12 पतसंस्था अवसायनात असून, त्या पतसंस्थांच्या सर्वच व्यवहारावर उपनिबंधकांचे नियंत्रण आहे. त्यातील काही पतसंस्थांवर दिवाळखोरीची कार्यवाही होणार आहे. सुमारे पंधराहून अधिक संस्थांचे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या सुरू आहेत. त्या संस्थांना अद्यापही अवसायनात म्हणून जाहीर केले नाही. 

वर्षभरात वेगवेगळ्या संघटना, सामान्य नागरिकांनी तालुक्‍यातील विविध पतसंस्थांच्या विरोधात किमान 400 तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे त्याचा निपटाराही होवू शकलेला नाही. काही पतसंस्था विरोधात आंदोलनेही झाली आहेत. त्यांचाही प्रश्न अद्याप शासकीय पातळीवर मार्गी लागू शकलेला नाही. कराड जनता सहकारी बॅंकेवर दाखल झालेल्या अपहाराचे प्रकरण, संचालक मंडळावर पावणेचार कोटींच्या नुकसानीचा ठपका यानंतर भागात खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पतसंस्था व त्यांच्या व्यवहाराच्या सुरक्षेबाबतची चर्चा होवू लागली आहे. पतसंस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात ठेवीदारांच्या ठेवी आहेत. त्या कितपत सुरक्षित आहेत, याबाबत सामान्यांतून चर्चा घडू लागली आहे. 
शहरासह तालुक्‍यात 150 हून अधिक पतसंस्था आहेत. त्यांच्या व्यवहाराबाबत नेहमीच चर्चा होत असते. त्यातील अनेक पतसंस्था चांगल्या सुरू आहेत. विविध पतसंस्थांबाबत वेगवेगळी चर्चा आहे. शहरात यापूर्वी भुदरगड, शांतीसागर बाहेरून आलेल्या पतसंस्थांनी व्यापाऱ्यांसह सामान्यांच्या कोट्यवधींच्या ठेवी बुडविल्या आहेत. त्याचा अनुभव असतानाही शहरातील लोक अजूनही पतसंस्थांकडे ज्यादा व्याजामुळे आकर्षित होताना दिसतात. शहरासह तालुक्‍यातील सुमारे 12 पतसंस्था सध्या अवसायानात आहेत. संस्थांवर उपनिबंधकांचे नियंत्रण आहे. त्या संस्थांत सामान्यांच्या कोट्यवधींच्या ठेवी अडकल्या आहेत. त्यासाठी अनेक लोक संस्थांमध्ये हेलपाटे मारत आहेत. मात्र, त्या बाराही संस्थांवर उपनिबंधकांचे नियंत्रण आहे. कोणताही व्यवहार त्यांच्या परवानगीशिवाय करता येत नाही. पुढील काळात अवसायनात जाणाऱ्या दहाहून अधिक संस्था काठावर आहेत. त्यांच्याही व्यवहाराची चौकशी सुरू आहे. त्यामध्ये संचालक मंडळावरही काही ठपका ठेवण्यात आला आहे. त्या सगळ्या चौकशा गोपनीयरीत्या सुरू आहेत. 
शहरासह तालुक्‍यातील विविध पतसंस्थांवर संघटना, व्यक्तीतर्फे दाखल झालेल्या तक्रारींची संख्या चारशेवर पोचली आहे. त्या संस्थांच्या कर्ज प्रकरणाबाबत जास्तीत जास्त तक्रारी झाल्या आहेत. किमान दोनशे तक्रारी बोगस कर्ज वितरणावर आहेत. पन्नास तक्रारी मुदत ठेव संपूनही संस्थेतून पैसे मिळत नाहीत, अशा आहेत. पंचवीसवर तक्रारी संचालकांच्या विरोधात आहेत. त्या सगळ्या अर्जांची चौकशी होणार की नाही, हे मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. ज्या संस्थांच्या कर्जवितरणाच्या तक्रारी आहेत, त्यात बहुतांशी तक्रारी या खोट्या स्वाक्षऱ्या करून कर्ज घेतल्याबद्दलच्या आहेत. त्याबाबत सखोल चौकशी झाल्याशिवाय काहीही माहिती सांगता येणार नाही, असे उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले. कराड जनता सहकारी बॅंकेच्या अपहाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पतसंस्थांच्या व्यवहाराबाबत शहर, तालुक्‍यात चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षितता व परतफेड याची चर्चा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com