एक दिवस घरी बसा, नाही तर भावकी 13 दिवस घरात बसायला येईल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

"जनावरांचं मुस्कं आता "मास्क' बनून माणसे वापरतात... जैसे करोना, वैसे भरोना' अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. 

नगर ः "घरबसल्या लाखो कमवा, असे सांगणाऱ्या कंपनीचा संपर्क क्रमांक आहे का कोणाकडे', "कोणाकडे उधारी बाकी असेल, तर त्याच्या घरी जाऊन या, आज तो घरीच सापडेल..' या नि अशा प्रकारच्या "पोस्ट' आज दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. "जनता कर्फ्यू'मुळे शहरासह जिल्ह्यातील सर्व रस्ते सामसूम असले, तरी सोशल मीडिया "पोस्ट'ने गजबजून गेला होता.

हेही वाचा - मंत्री मलिक यांच्या वाहनाला केडगावजवळ अपघात

घरातील कामे आटोपल्यावर मोकळ्या वेळेत अनेकांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. काही विनोदी पोस्टमुळे हास्याचे फवारे उडत होते. "फक्त एक दिवस घरात बसा, नाही तर भावकी 13 दिवस घरात बसायला येईल...' अर्थात, "जनता कर्फ्यू'त सहभागी न झाल्यास कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो, असा संदेश त्यातून दिला गेला. 

"जनता कर्फ्यू' रात्री नऊ वाजेपर्यंत आहे, त्यानंतर भारताने वर्ल्ड कप जिंकल्यासारखं बाहेर पडू नका,' "चोरी शून्य, मारामारी शून्य, अत्याचार शून्य, मात्र नवरा-बायकोची भांडणे हजारो' अशा संदेशांतून सोशल मीडियावर हास्याचे फवारे उडत होते. "शहरातून गावाकडे आलेल्यांना विनंती, आलाच आहात तर घरातच बसा, विनाकारण अर्ध्या चड्डीत गावभर बढाया मारत फिरू नका,' "जनावरांचं मुस्कं आता "मास्क' बनून माणसे वापरतात... जैसे करोना, वैसे भरोना' अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deserted roads, crowds on social media