क्‍वारंटाईनचा शिक्‍का असूनही ते तिघे गेले बेळगावात; कसे?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

हातावर क्वारंटाईनचा शिक्का असलेल्या महाराष्ट्रातील दोघे व गोव्यातील एकाला गुरुवारी (ता. 21) पोलिसांनी ताब्यात घेतले.

बेळगाव : हातावर क्वारंटाईनचा शिक्का असलेल्या महाराष्ट्रातील दोघे व गोव्यातील एकाला गुरुवारी (ता. 21) पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर या तिघांनाही आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. बेळगावातील मध्यवर्ती बस स्थानकावर हा प्रकार घडला. यातील विट्यातील एकाचा समावेश आहे. 

बस स्थानकावर तैनात एका पोलिसाच्या दक्षतेमुळे ते तिघे सापडले असून, त्यापैकी एकाला तीव्र ताप असल्याचे तपासणीत आढळून आले. त्या तिघांनाही बडस (ता. बेळगाव) गावी जायचे होते, त्यासाठी बसच्या शोधात ते स्थानकावर गेले होते, असे चौकशीत स्पष्ट झाले.

उपलब्ध माहितीनुसार, त्यातील एकजण विटा (जि. सांगली) , दुसरा पुणे येथून, तिसरा गोव्यातून आला होता. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे रुग्णवाहिका बोलावून त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. तेथे त्यांची पुन्हा आरोग्य तपासणी होणार असून गरज भासल्यास स्वॅबही तपासणीसाठी पाठवले जाईल; परंतु तोपर्यंत त्यांचे संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे. 

मार्केट पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल एच. बी. मडीवाळर हे गुरुवारी मध्यवर्ती बस स्थानकावर तैनात होते. त्यावेळी त्यांना क्वारंटाईन शिक्का असलेले तिघे आढळले. त्यातील एकामध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे त्यांनी लागलीच मार्केटचे निरीक्षक संगमेश शिवयोगी यांना याची माहिती दिली.

त्यांनी तातडीने आरोग्य विभागाला माहिती देऊन रुग्णवाहिका बोलावून त्यांना आरोग्य विभागाच्या हवाली केले. या प्रकारामुळे बस स्थानकावर काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Despite the quarantine stamp, the three went to Belgaum; How?