घराणेशाही हटविण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश करणार : दीपक पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

भारतीय जनता पक्षाने राजघराण्यातील दोघांना पक्षात घेतल्याचा निर्णय जिल्ह्यातील जनतेप्रमाणेच भाजपमधील बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्त्यांना रुचलेला नाही; परंतु अनेक जण बोलून दाखवत नाहीत. मत पेटीतूनच ते आपली नाराजी व्यक्त करतील, असे दीपक पवार यांनी सांगितले.

सातारा : गेली पाच वर्षे पक्ष वाढीसाठी निष्ठेने काम केले. ज्यांना हटविण्यासाठी सर्वसामान्यांना सोबत घेऊन लढलो त्यांनाच पक्षनेतृत्वाने उमेदवारी जाहीर केली. मी स्वाभिमानी माणूस आहे. कुणा समोरही लवणार नाही, मी लढणार. तसा जनतेचाही आग्रह आहे. घराणेशाही हटविण्याची जनतेची मानसिकता आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे हटाव सातारा-जावळी बचाव ही भूमिका घेत रविवारी पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. 

पवार म्हणाले, ""2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी बोलवून घेत उमेदवारी दिली. अवघ्या बारा दिवसांचा वेळ मिळाला, तरीही 54 हजार मते मिळवली. तेव्हा शिवेंद्रसिंहराजेंना 92 हजार मते पडली होती. मुख्यमंत्री व चंद्रकांत पाटील यांनी बोलावून घेतले. चांगली लढत दिली. मतदार संघात कामाला लागा, असे सांगितले. त्यानुसार गेली पाच वर्षे निष्ठेने पक्ष वाढीसाठी संघर्ष केला.

सातारा पालिका निवडणुकीसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढल्या. मतदारसंघातील घराघरांत पक्ष पोचविला. लोकसभेलाही जावळीतून मताधिक्‍य दिले. असे असताना दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी बोलावून घेतले. महामंडळ देतो म्हणाले. मला महामंडळ नको, उमेदवारी द्या, विजय होऊन दाखवतो असे त्यांना सांगितले. गेली पाच वर्षे मी शिवेंद्रसिंहराजे हटाव अशी भूमिका घेऊन मतदारांना आवाहन केले. 40 वर्षे एकाच घरात सत्ता नको, सामान्य माणसाच्या हातात सत्ता आली पाहिजे, असे आवाहन करत होतो. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही म्हणालो, तरीही वरिष्ठांनी त्यांना पक्षात घेतले. बर पक्षात घेऊन कार्यकर्त्यांना विचारात न घेता उमेदवारीची घोषणाही जाहीर केली. सामान्य माणसाऐवजी राजघराण्याचे वारस त्यांना बरा वाटला. 

या प्रकाराचा कार्यकर्त्यांना धक्का बसला. कोणत्याही पक्षात जावा; परंतु निवडणूक लढवायचीच असा आग्रह त्यांनी केला. मतदार संघातील जनतेनेही फोन करून तुम्ही मैदानात उतराच असा आग्रह धरला. मी ही स्वाभिमानी माणूस आहे. कुणासमोर लवणार नाही. ज्यांच्याबद्दल मतदारसंघात दूषित वातावरण आहे, त्यांच्या विरुद्ध लढणारच असा निर्धार करून रविवारी (ता. 22) राष्ट्रवादी कॉंग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहे. माझ्याबरोबर भाजपचे 388 बुथ प्रमुख, तालुका व शहर अध्यक्ष प्रवेश करणार असल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने त्यांनी आज आपल्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सपूर्द केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To destroy political family line i am entering NCP