खराब रस्त्यांसाठी देवालाच साकडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

शहरातील रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब आहे. जेथे रस्ता तेथे खड्डा या स्थितीमुळे अपघात घडू लागले आहेत. सुमारे तीनशे किलोमीटरचे रस्ते खड्डेमय झाल्याने त्यावरून ये-जा करणे अशक्‍य होत आहे. या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची आवश्‍यकता आहे.

कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने शहरातील काही खराब रस्ते दत्तक घेऊन त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेला निधी द्यावा, या मागणीचे निवेदन कोल्हापूर शहर सर्वपक्षीय नागरिक कृती समितीतर्फे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना देण्यात आले. येत्या 15 दिवसांत निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही श्री. जाधव यांनी दिली. 

शहरातील रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब आहे. जेथे रस्ता तेथे खड्डा या स्थितीमुळे अपघात घडू लागले आहेत. सुमारे तीनशे किलोमीटरचे रस्ते खड्डेमय झाल्याने त्यावरून ये-जा करणे अशक्‍य होत आहे. या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची आवश्‍यकता आहे. महापालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने शासनावर अवलंबून राहावे लागत आहे. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने काही रस्ते दत्तक घेऊन त्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी कृती समितीकडून आज करण्यात आली. 

कायदेशीर अडचण सोडवण्याची वकिलांची ग्वाही

ऍड. महादेवराव आडगुळे, ऍड. विवेक घाटगे यांनी निधी देण्यामध्ये काही कायदेशीर अडचण असल्यास ती सोडविण्यासाठी तत्पर राहण्याची भूमिका मांडली. ऍड. प्रशांत चिटणीस, मारुतराव कातवरे, किशोर घाटगे, बाबा पार्टे यांनी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या परिसरात पर्यटकांचा दररोज राबता असल्याने मंदिर परिसरातील रस्ते दुरुस्तीची मागणी केली. 

अंबाबाई मंदिराकडून उत्पन्न

श्री. जाधव म्हणाले, ""देवस्थान समितीकडे 3042 मंदिरे आहेत. त्यापैकी अंबाबाई मंदिराचे उत्पन्न मिळते. जोतिबा डोंगरावरून गेल्यावर्षी 1 कोटी 28 लाख रुपये उत्पन्न मिळाले. खर्च 1 कोटी 82 लाख रुपये झाला. शिर्डी, पंढरपूर, सिद्धिविनायक देवस्थानासारखी स्थिती देवस्थान समितीची नाही. जोतिबा, देवल क्‍लबच्या विकासासाठी निधी खर्च करावा लागणार आहे. समितीने धार्मिक, शैक्षणिक व आरोग्य उपक्रमांसाठी निधी खर्च करावा, अशी विधी व न्याय खात्याची भूमिका आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून रस्ते दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध केला जाईल.' 

शिष्टमंडळात निमंत्रक आर. के. पोवार, विक्रम जरग, महादेव पाटील, दिलीप पोवार, रवींद्र चौगुले, सुनील खिरुगडे, ऍड. रणजित गावडे, उदय पोवार, अशोक भंडारी, रियाज कागदी, संतोष माळी, किसन कल्याणकर, किरण पवार, सुनील देसाई, प्रकाश पाटील, संदीप घाटगे, भीमराव आडके, जहिदा मुजावर, प्रकाश घाटगे, लाला जगताप, महादेव जाधव, निरंजन कदम, फिरोज सरगूर आदींचा समावेश होता.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devasthan Committee Wii Give Fund To Repair Roads In Kolhapur