'वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करा'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

सांगली - आजचं जग तंत्रज्ञानावर स्वार झालंय. आपला टिकाव लागण्यासाठी विद्यार्थ्यांनी दृष्टिकोन विकसित करायला हवा. त्यासाठी शिक्षकांसह पालकांचेही प्रोत्साहन गरजेचे आहे, असे मत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी आज येथे व्यक्त केले. 

सांगली - आजचं जग तंत्रज्ञानावर स्वार झालंय. आपला टिकाव लागण्यासाठी विद्यार्थ्यांनी दृष्टिकोन विकसित करायला हवा. त्यासाठी शिक्षकांसह पालकांचेही प्रोत्साहन गरजेचे आहे, असे मत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी आज येथे व्यक्त केले. 

जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग आणि राजमती सार्वजनिक ग्रंथालयतर्फे आयोजित विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सवाला आज प्रारंभ झाला. उद्‌घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. गायकवाड  बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर, प्रा. वैजनाथ महाजन, जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे सुरेश पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी महेश चोथे, प्राथमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. गायकवाड म्हणाले, ‘‘विज्ञानाबरोबर वाचनाची गोडी देखील विद्यार्थ्यांना लावली पाहिजे. कमी वयात वाचनाची गोडी लागते. वाचनामुळे माणून समृद्ध होतो. त्यामुळे वाचनही काळाची गरजच आहे. त्यासाठी अशी ग्रंथमहोत्सव फायदेशीर ठरतात.’’ डॉ. भवाळकर म्हणाल्या, ‘‘आपण टेक्‍नोसॅव्ही बनलो तर विज्ञान मिळाले असे होत नाही. यंत्र किंवा विज्ञान हे उदासीन असते. त्याचा उपयोग कशासाठी करायचा हा विचार पक्क असायला हवा; शिवाय पालक आणि शिक्षकांनीही साचेबद्ध विचार सोडले पाहिजे, मुक्त शिक्षण दिले पाहिजे.’’ प्रा. महाजन म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या डोक्‍यात अभ्यास कोंबू नये. त्यांना मुक्त शिक्षणाची आता गरज आहे. त्यातून नवे वैज्ञानिक नक्कीच तयार होतील.’’ सकाळी विज्ञान दिंडी व ग्रंथदिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतले. डॉ. शोभा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कक्षाधिकारी अजिंक्‍य कुंभार यांनी आभार मानले. 

Web Title: Develop a scientific approach