जुळे सोलापूरच्या विकास योजनेला अंतिम मंजुरी

विजयकुमार सोनवणे 
शनिवार, 14 जुलै 2018

नकाशा पाहिल्यावर होईल स्पष्टीकरण 
आरक्षणामध्ये करण्यात आलेल्या फेरबदलाची नेमकी स्थिती नकाशा पाहिल्यावर स्पष्ट करता येईल. फेरबदलानुसारचा नकाशा प्राप्त झाल्यानंतर फेरबदलावर अधिकृत भाष्य करता येईल, असे सांगण्यात आले. 

सोलापूर : जुळे सोलापूर (भाग-1) आणि (भाग-2)च्या विकास योजनेतील अनुक्रमे पाच आणि तीन, अशा एकूण प्रलंबित आठ प्रस्तावांच्या फेरबदलास शासनाने 10 जुलै रोजी मंजुरी दिली आहे. त्यातील फेरबदल राजपत्रात प्रसिद्ध केले आहेत. फेरबदल आणि कायम ठेवलेल्या आरक्षणांबाबत सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. हा बदल नागरिकांना पाहण्यासाठी प्रसिद्धीच्या तारखेपासून एक वर्ष महापालिकेत ठेवण्यात येणार आहे. 

विकास योजना एकमधील इपी (इनक्‍युलेड प्लॅन) एकमधील साइट क्रमांक 18ची जागा वाहनतळासाठी प्रस्तावित करण्यात आली होती. त्यात फेरबदल करण्यात आला असून, आता ही जागा एमएसएमबीसाठी आरक्षित करण्यात आली आहे. इपी दोनमधील 12 मीटरचा प्रस्तावित रस्ता रद्द करण्यात आला असून, हा परिसरही "पब्लिक-सेमी-पब्लिक झोन'मध्ये परावर्तित करण्यात आला आहे. इपी तीनमध्ये हायस्कूल व प्राथमिक शाळेसाठी असलेले आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. इपी चारमधील रहिवास व मार्केटसाठी प्रस्तावित जागा नियोजनानुसार विकसित करण्यात येणार आहे. इपी पाचमधील जिल्हा केंद्राचे आरक्षण कायम ठेवण्यात आले असून, 12 मीटरचा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. 

विकास योजना दोनमधील तीन आरक्षणांत बदल करण्यात आला आहे. इपी एकमधील साइट क्रमांक सहाची जागा मैदानासाठी राखीव होती. साइट क्रमांक आठ व नऊमध्ये प्रस्तावित प्राथमिक शाळा व सांस्कृतिक केंद्राचे आरक्षण पूर्णपणे रद्द करण्यात आले असून, हा परिसर रहिवासमध्ये परावर्तित करण्यात आला आहे. इपी दोनमधील साइट क्रमांक 12 मध्ये प्रस्तावित मुलांच्या खेळाच्या मैदानाचे आरक्षण कायम ठेवले आहे. इपी तीनमधील 12 मीटरचा रस्ता रहिवास झोनमध्ये परावर्तित करण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश महापालिकेस मिळाले असून, ते लवकरच नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केले जाणार आहेत. 

नकाशा पाहिल्यावर होईल स्पष्टीकरण 
आरक्षणामध्ये करण्यात आलेल्या फेरबदलाची नेमकी स्थिती नकाशा पाहिल्यावर स्पष्ट करता येईल. फेरबदलानुसारचा नकाशा प्राप्त झाल्यानंतर फेरबदलावर अधिकृत भाष्य करता येईल, असे सांगण्यात आले. 

Web Title: development in solapur