पाण्यानंतर विकासकामावरुन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा

प्रा. प्रशांत चवरे
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

भिगवण - इंदापुर तालुक्यामध्ये पाणी प्रश्नावरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा चालु असतानाच डिकसळ (ता.इंदापुर) येथील एकाच विकासकामांची काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी चुरशीने उद्घाटने करत ही विकासकामे आम्हीच केला असा दावा केला आहे. एकाच कामावर दोघांनीही दावा सांगितल्यामुळे आत्ता पाणी प्रश्नावरील यशापयशावरुन सुरु असलेल्या वादामध्ये विकास कामांच्या श्रेयावरुनही चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

भिगवण - इंदापुर तालुक्यामध्ये पाणी प्रश्नावरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा चालु असतानाच डिकसळ (ता.इंदापुर) येथील एकाच विकासकामांची काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी चुरशीने उद्घाटने करत ही विकासकामे आम्हीच केला असा दावा केला आहे. एकाच कामावर दोघांनीही दावा सांगितल्यामुळे आत्ता पाणी प्रश्नावरील यशापयशावरुन सुरु असलेल्या वादामध्ये विकास कामांच्या श्रेयावरुनही चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

इंदापुर तालुक्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सत्तासंघर्ष विधानसभा निवडणुक जशी जवळ येऊ लागली आहे तसा अधिक तीव्र होताना दिसत आहे. दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी विधानसभेची जागा आपलीच असा संदेश तालुक्यातील उमेदवारांना दिल्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये आपले पारडे जड रहावे यासाठी दोन्ही बाजुंकडुन तीव्र प्रयत्न करण्यात येत आहेत. मागील वीस वर्षे सत्तेत असताना इंदापुर तालुक्याला कधी पाण्यासाठी संघर्ष करावा लागला नव्हता परंतु मागील चार वर्षामध्ये इंदापुरचे वाळवंट झाल्याची टिका राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील करीत आहेत. कालवा समितीमध्ये या विषयावर न बोलता विरोधक लोकांची दिशाभुल करीत असल्याचा आक्षेप आमदार दत्तात्रय भरणे यांचेकडुन घेतला जात आहे.

आमदार दत्तात्रय भरणे यांनी अर्थुर्णे येथे शेतकरी मेळावा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन करत आगामी विधानसभेला आपणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असणार असल्याचा संदेश दिला होता. हर्षवर्धन पाटील हे मागील काही दिवसांपासुन आक्रमक झाल्याचे चित्र पुढे येत आहे. काँग्रेस जनसंघर्ष यात्रा, एकता रॅली, पळसदेव येथे पाण्यासाठी केलेले रास्ता रोको आंदोलन सत्ताधाऱ्यांचे अपयश जनतेसमोर आणण्याचा प्रयत्नात असल्याचे दिसत आहे.

तालुक्यातील पाणी प्रश्न व कार्यक्रमातील शक्तीप्रदर्शनात आत्ता विकासकामांच्या श्रेयावरुन काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा रंगला आहे. डिकसळ(ता.इंदापुर) येथील दलितवस्ती रस्ता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजुर केला असल्याचे सांगत त्याचे उद्घाटन करण्याचा हक्क राष्ट्रवादीचाच आहे असे म्हणत प्रवीण माने यांनी या रस्त्याचे उद्घाटन काँग्रेसच्या नियोजित कार्यक्रमाच्या आधी केले तर काँग्रेसच्या वतीनेच या रस्त्यासह इतरही ३८ लाख रुपयांची कामे समाजकल्याण विभागाकडुन मंजुर केल्याचे श्रेय काँग्रेस पक्ष्याचे असल्याचे सभापती करणसिंह घोलप यांनी सांगितले. शिरसोडी येथील वीज उपकेंद्र हे काँग्रेसच्या प्रयत्नातुन मंजुर झाले आहे त्याचे उद्घाटन कसे चालते असे म्हणत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विरोधकांना चिमटा काढला आहे.

वरिष्ठ पातळीवरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीच्या हालचाली सुरु असताना तालुक्यामध्ये मात्र दोन्ही पक्ष्यांच्या नेत्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. विधानसभा निवडणुक जशीजशी जवळ येते तसतसा यामध्ये आणखीनच रंग भरणार असल्यामुळे लोकांचे मात्र याकडे बारीक लक्ष आहे.

Web Title: on development of water problem congress & rashtrawadi congress has conflict