सोलापुरात विकासकामांचा मार्ग मोकळा

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

सोलापूर : प्रभागातील विकासकामांसाठी ऐच्छिक खर्चाचे अभिप्राय देण्यास मुख्य लेखापाल कार्यालयाने सुरवात केली आहे. प्रत्येक नगरसेवकाला सहा लाखांच्या निधीतून विकासकामे सुचविता येणार आहेत. या कामांसाठी सहा कोटी 42 लाखांची तरतूद आहे. आता नगरसेवकांना भांडवली निधीच्या उपलब्धतेची प्रतीक्षा आहे.

सोलापूर : प्रभागातील विकासकामांसाठी ऐच्छिक खर्चाचे अभिप्राय देण्यास मुख्य लेखापाल कार्यालयाने सुरवात केली आहे. प्रत्येक नगरसेवकाला सहा लाखांच्या निधीतून विकासकामे सुचविता येणार आहेत. या कामांसाठी सहा कोटी 42 लाखांची तरतूद आहे. आता नगरसेवकांना भांडवली निधीच्या उपलब्धतेची प्रतीक्षा आहे.

अधिनियमातील तरतुदीनुसार अंदाजपत्रकाच्या दोन टक्के ऐच्छिक निधी उपलब्ध करावा लागतो, त्यानुसार हा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. भांडवली निधी हा शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या अनुदानावर अवलंबून असतो. त्यामुळे अनुदान जेव्हा जेव्हा उपलब्ध होईल, त्या-त्यावेळी भांडवली निधी उपलब्ध करून दिला जातो. प्रभागविकास निधी मिळण्याची हमी असल्याने नगरसेवकांनी अभिप्राय देण्याचे पत्र देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे किमान प्रभागातील छोटी-मोठी कामे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या गाळ्यांच्या ई-लिलावाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना किंवा पत्र अद्यापही पालिकेस मिळालेले नाही. दरम्यान, लिलावाला स्थगिती मिळाल्याने संभाव्य उत्पन्न महापालिकेस मिळणार नाही. हे अपेक्षित धरून आयुक्तांनी, 2017-18 च्या निविदांना मिळालेला अत्यल्प प्रतिसाद पाहता, 2018-19 मधील भांडवली कामे लगेच सुचविता येणार नाहीत, याचे संकेत दिले आहेत. तसे स्पष्ट आदेश मुख्यलेखापालांना दिले आहेत.

आर्थिक वर्ष 2014-15 आणि 2015-16 या कालावधीतील मंजूर भांडवली निधीतून जी कामे सुरू करण्याचे आदेश 30 जून 2018 पूर्वी देण्यात आले आहेत, असा निधी 31 डिसेंबर 2018 अखेर खर्ची टाकण्यास अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. 30 जूनपूर्वी कामाचा आदेश न दिलेल्या कामांचा निधी शासनाकडे जमा करण्यास सांगितले आहे.

प्रभागविकास निधीतून प्रत्येकी सहा लाख रुपयांच्या कामांचे अभिप्राय देण्यास सुरवात केली आहे. जसे प्रस्ताव येतील, तसे अभिप्राय देण्यात येणार आहेत. 
- शिरीष धनवे, मुख्य लेखापाल 
सोलापूर महापालिका

Web Title: development works start in Solapur