सत्ता द्या इस्लामपूरसाठी; राज्याची तिजोरी खुली करू - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

इस्लामपूर - 'इस्लामपूरच्या जनतेने सत्तापरिवर्तन करावे, राज्याची तिजोरी शहराच्या विकासासाठी खुली राहिल,'' अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. पालिका निवडणूक पार्श्‍वभूमीवर विकास आघाडी व मित्रपक्ष शिवसेनेच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

इस्लामपूर - 'इस्लामपूरच्या जनतेने सत्तापरिवर्तन करावे, राज्याची तिजोरी शहराच्या विकासासाठी खुली राहिल,'' अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. पालिका निवडणूक पार्श्‍वभूमीवर विकास आघाडी व मित्रपक्ष शिवसेनेच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'शहरात भुयारी गटारची व्यवस्था नाही. निवडणुकीनंतर नव्या सत्ताधाऱ्यांनी पहिला प्रस्ताव त्याचाच द्या, झटक्‍यात मंजूर करू. कच्ची घरे व झोपडपट्टीवासीयांसाठी पक्‍क्‍या घरांचा प्रस्ताव दिल्लीतून मंजूर करून आणू. मोदी सरकारने शहरांच्या विकासाचे नवे नियोजन केले. शंभर शहरे हागणदारीमुक्त केली. राज्याच्या तिजोरीतून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक पैशाचा हिशेब ठेवू. महिन्यात ई-टेंडर, शंभर दिवसांत वर्कऑर्डर झालेच पाहिजे हा नियम लागू केला आहे. निकृष्ट कामांना थारा नसेल. "सगळे भाऊ मिळून मिळून खाऊ' हे चालणार नाही. पैसा जनतेचा आहे. तो त्यांच्यावर योग्यप्रकारे खर्च झाला पाहिजे.

डिजिटलवर भर राहील. तंत्रज्ञानयुक्त चांगले प्रशासन देऊ. विकास आघाडी सत्तेसाठी, घराणेशाहीसाठी नाही तर परिवर्तनासाठी हवी आहे. ही आघाडी सामान्यांचे जीवनमान उंचावेल.''

ते म्हणाले, 'इथे सत्ता द्या. विकासाची हमी मी देतो. अन्यायग्रस्त विकास आराखडा दुरुस्त करू. चांगले शहर बनवू. राष्ट्रवादीच्या हाती वर्षे इतकी वर्षे सत्ता दिली, आता परिवर्तनाची वेळ आली.''

ते म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेऊन भ्रष्टाचाराविरुद्धची मोठी लढाई सुरू केली आहे. सामान्यांना त्रास होत आहे, मात्र 50 दिवस सहन करा. या निर्णयाने काळे धंदेवाले, पाकीस्तानच्या प्रेसमधून भारतात येणाऱ्या नकली नोटा, घरात, तिजोरीत, पलंगाखाली दाबून ठेवलेल्या पैशावर प्रहार झाला आहे. कष्टाच्या पैशांना महत्त्व येईल. आर्थिक स्वातंत्र्याची लढाई आहे. 50 दिवस सैनिक बनून लढायचे आहे.''

शहरातील उद्यानांच्या यादीवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, 'शहर वाय-फाय करण्याऐवजी विकास करावा. हे अमेरिकेसारख्या देशात आलेत का? असा प्रश्‍न पडतो.''

मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, '31 वर्षांत विरोधात जाणारांच्या जागेवर आरक्षण टाकण्याचे काम झाले. नाट्यगृह, सभागृहांना नावे कोणाची दिलीत. 311 कोटी रुपये खर्च केल्याचे सत्ताधारी सांगतात. पैसे गेले कुठे? इतक्‍या पैशात नोटांचे रस्ते झाले असते.''

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 'केंद्र, राज्यात जसे परिवर्तन झाले, तसे इस्लामपुरातही घडवा.'' खासदार संजय पाटील, बाबा सूर्यवंशी, राजाराम गरुड, गोपीचंद पडळकर, अरुण कांबळे, मुकुंद कांबळे यांची भाषणे झाली. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, वनश्री नानासाहेब महाडिक, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, राहुल महाडिक, अमित ओसवाल, माजी आमदार भगवानराव साळुंखे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निशिकांत पाटील, वैभव पवार, एल. एन. शहा, नगरसेवक विजय कुंभार उपस्थित होते. विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी प्रास्ताविक केले. अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांनी शिवसेनेचे आनंदराव पवार व नगराध्यक्षपदाचे उमेदवार निशिकांत पाटील यांना पाठिंबा दिला. त्यांचा व बिनविरोध नगरसेवक सीमा पवार यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला.

सदाभाऊ लढाऊ नेते
सदाभाऊ लढाऊ कार्यकर्ते आहेत. आमचे सरकार धनदांडग्यांचे नाही, सामान्यांचे आहे. म्हणून सदाभाऊंना मंत्रिपद दिले मेहेरबानी केली नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दिलीपतात्या आमदार असते...
सदाभाऊ भाजपचे पाय धरून मंत्री झाले, या जयंत पाटील यांच्या टीकेवर सदाभाऊ म्हणाले, त्यांनी कार्यकर्त्यांना महत्त्व दिले असते, तर आज दिलीपतात्या आमदार असते. जाणीवपूर्वक तिकीट दिले नाही.

निधी कमी पडणार नाही
'विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील व मी 20 वर्षे भाजप युवा मोर्चात एकत्र काम केले. आमची मैत्री आहे. त्यांनी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील व सदाभाऊ खोत यांनी इस्लामपुरातील समस्या सांगाव्या. निधी कमी पडू देणार नाही.''

Web Title: devendra fadnavis speech in islampur