विठ्ठल चरणी भाविकाकडून तब्बल एक कोटीची देणगी

भारत नागणे
रविवार, 21 जुलै 2019

एकाच भाविकाने एक कोटी रूपयांची रोख स्वरूपात देणगी देण्याची मंदिर समितीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. 

पंढरपूर : मुंबई येथील जयंतराव म्हैसकर या भाविकाने आज (रविवार) विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीला 11 लाख रूपयांची देणगी दिली. म्हैसकर हे निस्सीम विठ्ठल भक्त असून त्यांनी अलीकडच्या तीन वर्षात विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीला रोख स्वरूपात तब्बल 1 कोटी रूपयांची देणगी दिली आहे.

एकाच भाविकाने एक कोटी रूपयांची रोख स्वरूपात देणगी देण्याची मंदिर समितीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. 

आषाढी यात्रा काळात विठ्ठल चरणी साडेचार कोटी रूपयांचे दान भाविकांनी अर्पण केले आहे. देणगीचा हा ओघ आषाढी वारीनंतर ही असाच सुरू आहे. मुंबई येथील भाविक जयंत म्हैसकर यांनी आज विठ्ठल चरणी तब्बल 11 लाख रूपयांची देणगी अर्पण केली आहे. म्हैसकर हे बांधकाम व्यवसायिक आहेत. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहेत. गेल्या तीन वर्षात त्यांनी विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीला तब्बल 1 कोटी रूपयांची देणगी दिली आहे. रोख स्वरूपात एक कोटी रूपयांची देणगी देणारे म्हैसकर हे मंदिर समितीचे  एक मेव देणगीदार ठरले आहेत. वाढत्या देणगीच्या ओघामुळे गरीबांचा देव श्रीमंत होऊ लागला आहे.

म्हैसकर यांचे मित्र चेतन प्रधान यांनी आज 51 हजार रूपयांची देणगी दिली आहे. म्हैसकर यांच्या वतीने पंढरपूर येथील बांधकाम व्यवसायिक मारूती वाघमोडे यांनी 11 लाखाच्या देणगीचा धनादेश कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मंदिर समितीच्या वतीने वाघमोड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, लेखापाल सुरेश कदम, विनोद पाटील आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devotee donate one crore ruprees in vitthal rukmini mandir in Pandharpur